‘काश्मीर मॉडेल आता दिल्लीत निर्यात’, दिल्लीतील इंटरनेट बंदीवर ओमर अब्दुल्ला संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शनिवारी होणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या काही भागांतील इंटरनेट सेवा बंद करण्याच्या निर्णयावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी टीका केली. ‘काश्मीर मॉडेल आता दिल्लीत निर्यात करण्यात आले आहे. नव्या जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर तयार झालेल्या नव्या दिल्लीचे स्वागत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून सरकारला टोला लगावला.

दिल्लीतील मध्यवर्ती भागात इंटरनेट सेवा बंद करण्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर ही प्रतिक्रिया दिली. शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे नियोजन आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये 35 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

शनिवारी होणाऱ्या ‘जंतरमंतर 2.0’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली परिसरात 35 हजारांहून अधिक दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेबाबत जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी सीजेपीने या आंदोलनाचे आवाहन केले आहे.