
दिल्लीत डिटेन्शन, पोलीस राज्य सुरू झाले आहे. जेव्हा डिटेन्शन आणि पोलीस राज्य सुरू होते तेव्हा देशामध्ये आणीबाणी लागलेली आहे हे मान्य केले पाहिजे. आणीबाणीनंतर काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेले होते आणि आता भाजपमध्ये दुफळी, तिफळी निर्माण झाली आहे. मोदींचे सरकार हे पुढल्या सहा-सात महिन्यानंतर दिसणार नाही. आताच मोदी सरकारची वाचा गेली असून बंदुकीच्या बळावर राज्य सुरू आहे, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली. दिल्लीतील आंदोलन, धरपकड, अटका आणि पोलीस कारवाई याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले की, हा विषय कॉक्रोच जनता पार्टीपुरता मर्यादीत नसून देशाचा विषय झाला आहे. सीजेपीच्या मुलांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन थांबले नाही. काल काही माजी मुख्यमंत्र्यांना, खासदारांना अटक झाली. दिल्ली डिटेन्शन राज्य झाले आहे. जेव्हा डिटेन्शन आणि पोलीस राज्य सुरू होते तेव्हा देशामध्ये आणीबाणी लागलेली आहे हे मान्य केले पाहिजे. हिटलरने त्याच्या अखेरच्या काळात जर्मनीमध्ये याच प्रकारचे वर्तन केले होते. आंदोलन दडपणे, विरोधकांना अटक करणे, लोकांना घरात कोंडून ठेवणे, संपूर्ण लॉकडाऊन करणे हे हिटलर आणि मुसोलिनीने त्यांच्या देशात केले.
हिंदुस्थानमध्ये त्याच प्रकारची परिस्थिती, खदखद आहे. ही खदखद फक्त विरोधकांमध्ये नाही, तर भाजपमध्ये स्पष्ट दिसू लागेल. पुढच्या काही महिन्यात मार्च-एप्रिल या दरम्यान देशात राजकीय परिवर्तन होईल. मोदी पंतप्रधान पदावर राहणार नाहीत. आणीबाणीच्या आधी किंवा नंतर जनता पक्ष स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून गेले. जगजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासह अनेक मोठे लोक पक्ष सोडून गेले. भाजपमध्ये तशा प्रकारची खदखद सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपमध्ये दुफळी, तिफळी माजलेली आहे. इतक्या मोठ्या मोदी विरोधी आंदोलनामध्ये कोणताही प्रमुख नेता, मंत्री मोदी किंवा शहांची बाजू घेऊन ठामपणे उभा राहिल्याचे दिसत नाही. हे चित्र स्पष्ट सांगतेय की भाजपमधील मोदी-शहा पर्वाचा अस्त होतोय. अनेक प्रमुख नेते भविष्यात मोदी-शहांपासून दूर जातील किंवा वेगळा निर्णय घेतील, अशा प्रकारची स्थिती भाजपमध्ये याक्षणी आहे. लवकरच हे दृश्य दिसेल, असेही संजय राऊत ठाणपणे म्हणाले.
CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांची 24 तासानंतर सुटका; अटी-शर्तींसह जामीन मंजूर
मोदी-शहा हे सैन्यबळाचा वापर करून आपले राज्य टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीमध्ये काल जम्मू-कश्मीर, आसाम, छत्तीसगडमधील सशस्त्र दल लाखोंच्या संख्येने उतरवण्यात आले. तरीही लोक रस्त्यावर उतरले. हजारो जणांना अटक झाली. मुंबईतही आंदोलन झाले. स्वातंत्र्यलढ्याचे महानायक महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांना याबद्दल माफी मागावी लागेल. आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही तिथे गेलो, ठिय्या दिला आणि शेवटी तुषार गांधी यांची सुटका करून घेतली, असेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या आंदोलनानंतर तुषार गांधी यांची सुटका; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
सरकार पूर्णपणे घाबरलेले आहे. मोदी-शहा दरवाजे बंद करून बसले आहेत. ज्या कृष्णमेनन रोडला अमित शहा राहतात त्याला एखाद्या सैन्य छावणीचे स्वरुप आले आहे. त्यांच्या घराच्या आसपास दीड लाख सशस्त्र पोलीस घेराबंदी करून उभे आहेत. शहांच्या घरात चिटपाखरूही जाऊ शकत नाही अशी घेराबंदी केली आहे. एवढा डरपोक गृहमंत्री देशाला लाभला आहे आणि हा देशाचे रक्षण करणार? मोदींच्या आसपास तर दोन किलोमीटर पर्यंत सैन्य लावले आहे. कितीही सैन्य लावले तरी मोदी-शहांची जुलमी राजवट या देशातील जनतेच्या बंडामध्ये उलथवून टाकली जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.























































