रियाध विमानतळावर हुती बंडखोरांचा हल्ला, 12 ठार, 300 हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरबची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर येमेनच्या हुती बंडखोरांनी भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका हिंदुस्थानी नागरिकासह सौदीचे चार, दोन बांगलादेशी, अमेरिका, जॉर्डन, पॅलेस्टाईन, सीरिया, सुदान व इजिप्तमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सौदी अरेबियातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यातील अनेक जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण आला होता. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर याआधीही आठ दिवसांत दोन हल्ले झाले असून त्यात चारजणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिका सामील होण्याच्या तयारीत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांना भयानक म्हटले आहे. वॉशिंग्टन सध्या आपल्या पर्यायांवर विचार करत असल्याचे सांगितले. वॉशिंग्टन सौदी अरेबियासोबत हुतींविरुद्धच्या हल्ल्यामध्ये सामील होण्याबाबत अद्याप विचार करत असून आम्ही कदाचित सामील होऊ, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.