
रशियाच्या सैन्यात काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या तेलंगणातील एका हिंदुस्थानी नागरिकाचा रशिया-युक्रेन युद्धाच्या आघाडीवर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद अफजल खान (वय 43) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या मृत्यूची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय आणि मॉस्कोमधील हिंदुस्थानी दूतावासाकडे त्याच्या ठावठिकाणाची माहिती मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अफजल खान हा तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील बन्सवाडा येथील रहिवासी आहे. रशियाच्या सैन्यात भरती झाल्याचे सांगितले जाणारे सिरशू अशोक याने आपल्या पत्नीला पाठवलेल्या व्हॉइस मेसेजमुळे अफजलच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. अशोक याने अफजलचा सुमारे आठवडाभरापूर्वी रशिया-युक्रेन युद्धाच्या आघाडीजवळ मृत्यू झाल्याचे सांगितल्याचा दावा आहे. हा संदेश अफजलच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदतीची मागणी केली.
अफजलच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसल्याने रशियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याची माहिती मिळवावी, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे. मृत्यू झाल्याचे निश्चित झाल्यास मृतदेहाची ओळख पटवून तो हिंदुस्थानात आणण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय रशियात अडकलेल्या अन्य तीन भारतीयांची सुरक्षित सुटका करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आवाहनही कुटुंबीयांनी केले आहे.
तेल उद्योगात नोकरीचे आमिष; रशियात सैन्याशी संबंधित कामात अडकल्याचा आरोप
तेलंगणातील चार जण रोजगाराच्या शोधात रशियाला गेले होते. त्यांना तेल उद्योगात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना सैन्याच्या छावण्यांमध्ये आणि युद्धग्रस्त भागांमध्ये काम करावे लागल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. भुक्या रविंदर, सिरशू अशोक, मेगावत प्रकाश आणि मोहम्मद अफजल खान अशी या चौघांची नावे आहेत.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रशियात पोहोचल्यानंतर सुरुवातीला या चौघांना गवत कापणे आणि बागकामासारखी कामे देण्यात आली. त्यांनी सुमारे पाच महिने काम केले; मात्र त्यांना केवळ दोन महिन्यांचेच वेतन मिळाले. त्यानंतर त्यांचा रोजगारही गेला.
पुढे त्यांना रशियाच्या सैन्याशी संबंधित कामांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. रशियन नागरिकत्व आणि आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
युद्धाच्या आघाडीवर धोकादायक कामे दिल्याचा आरोप
रशियात अडकलेल्या या हिंदुस्थानी नागरिकांना बॉम्ब वाहून नेण्यासह युद्धाच्या आघाडीवर धोकादायक कामे करावी लागल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांना शारीरिक त्रास देण्यात आला आणि त्यातून काही जण जखमी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या चौघांच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी 29 सप्टेंबर रोजी तेलंगणा सरकारकडे धाव घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
अफजल खानच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांची चिंता आणखी वाढली आहे. त्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती मिळवणे, त्याची ओळख निश्चित करणे आणि तो मृत असल्यास त्याचा मृतदेह मायदेशी आणणे, या मागण्यांवर आता भर दिला जात आहे.
रशियन सैन्यात भरती झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या प्रकरणांमध्ये हिंदुस्थान सरकारने यापूर्वीही हस्तक्षेप केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एकूण 227 हिंदुस्थानींचा रशियन सैन्यात भरती झाली होती. त्यापैकी 139 जणांना सेवेतून मुक्त करण्यात आले होते, तर 51 हिंदुस्थानींचा मृत्यू झाला होता.
तेलंगणातील या चौघांच्या प्रकरणामुळे रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या हिंदुस्थानींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोजगाराच्या आशेने परदेशात गेलेल्या हिंदुस्थानींना सैन्याशी संबंधित कामांमध्ये अडकवले जात असल्याच्या आरोपांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
अफजल खानच्या मृत्यूबाबत अद्याप अधिकृत पुष्टी नसल्याने रशियन अधिकाऱ्यांकडून पडताळणी केलेली माहिती मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर रशियात अडकलेल्या उर्वरित हिंदुस्थानींची सुरक्षित सुटका करण्यासाठी केंद्र सरकार आणि हिंदुस्थानी दूतावास कोणती पावले उचलतात, याकडे त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.


























































