पंजाबची अंतिम मतदार यादी जाहीर, SIR प्रक्रियेनंतर यादीतून १३.६० लाख नावे वगळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये नुकत्याच राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या नव्या आणि सुधारित मतदार यादीतून तब्बल १३ लाख ६० हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, ७ लाख ९७ हजार नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील मतदार याद्या आणि एसआयआर प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच पंजाबमधील ही मोठी आकडेवारी समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंतिम यादीतून वगळण्यात आलेल्या १३.६० लाख नावांमध्ये प्रामुख्याने मयत झालेले मतदार, राज्याबाहेर किंवा परदेशात कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक तसेच दुबार नोंदणी असलेल्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे या प्रक्रियेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या जवळपास ८ लाख मतदारांमध्ये नव्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांचा मोठा वाटा आहे. निवडणूक आयोगाने या प्रक्रियेअंतर्गत सुरुवातीला १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या.

प्रारूप यादीवर नागरिकांकडून आलेल्या अर्जांवर आणि हरकतींवर १२ सप्टेंबरपर्यंत सविस्तर छाननी करण्यात आली. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला आणि आता ही सुधारित अंतिम यादी अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आली आहे.