
>> दिलीप देशपांडे
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर हा संपूर्ण महाराष्ट्रात ’वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘‘पुस्तके ही माणसाची सर्वात चांगले मित्र असतात आणि तीच प्रज्वलित मनांची निर्मिती करतात’’ असा डॉ. कलाम यांचा ठाम विश्वास होता. त्यांची हीच विचारसरणी नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाजात वाचक चळवळ पुन्हा जिवंत करण्यासाठी या दिवसाची सुरुवात झाली. आजच्या डिजिटल झालेल्या युगात या दिवसाचे औचित्य साधत, आपली वाचन संस्कृती नेमकी कुठे उभी आहे आणि भविष्यातील अपेक्षा कोणत्या, याचा सखोल वेध घेणे गरजेचे बनले आहे.
आजची परिस्थिती अतिशय संमिश्र आणि काहीशी चिंतेची बनली आहे. आपण एका बाजूला तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलो आहोत, तर दुसऱ्या बाजूला पुस्तकांचे पान उलटण्याचा आनंद विसरत चाललो आहोत. आजचे बालक, तरुण आणि अगदी ज्येष्ठ नागरिकही स्मार्टफोन, सोशल मीडिया रील्स (Reels), शॉर्ट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या जाळ्यात अडकले आहेत. या डिजिटल क्रांतीने माणसाचे जीवन सोपे केले असले तरी वाचन संस्पृतीवर मात्र मोठा आघात केला आहे.
स्क्रीनच्या अति वापरामुळे मानवी मनाचा एकाग्रतेचा काळ कमालीचा घटला आहे. तासन्तास रील्स स्क्रोल करणारे तरुण पुस्तकाचे एक पान सलग वाचायला कंटाळतात, हे आजचे कटू वास्तव आहे. 15 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये आनंद शोधणाऱ्या पिढीला 300 पानांचे पुस्तक वाचण्यासाठी लागणारा संयम आणि वेळ देणे कठीण वाटू लागले आहे.
इंटरनेटमुळे आज माहितीचा महापूर आला आहे. कोणत्याही विषयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते, परंतु माहिती (Information) आणि ज्ञान (Knowledge) यामध्ये मोठा फरक असतो. गुगल किंवा सोशल मीडियावरून मिळणारी माहिती ही बहुतांश वेळा उथळ, विखुरलेली आणि काही वेळा दिशाभूल करणारी असू शकते. याउलट पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान हे पद्धतशीर, सखोल आणि माणसाला वैचारिक प्रगल्भता देणारे असते. आजची पिढी माहितीने समृद्ध होत आहे, पण ज्ञानाच्या बाबतीत ती दरिद्री ठरत आहे.
औपचारिकता बनलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’ची सर्वात मोठी खंत म्हणजे शाळा-महाविद्यालयांमध्ये हा केवळ 15 ऑक्टोबरपुरता साजरा केला जाणारा एक दिवसाचा ‘सोहळा’ किंवा ‘फोटो काढण्याचा इव्हेंट बनून राहिला आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांना एकत्र बसवून वाचन करायला सांगितले जाते, पुस्तक प्रदर्शन भरवले जाते, सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले जातात आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तोच मोबाईलचा दिवस सुरू होतो. वर्षभर त्या सवयीचे सातत्य राखले जात नाही.
वाचनाचे बदलते स्वरूप बघता वाचनाची व्याख्या बदलली आहे. ई-बुक्स (E-books), किंडल (Kindle) आणि ऑडिओ बुक्सचा (Audiobooks) वापर वाढला आहे. ही स्वागतार्ह बाब असली, तरी छापील पुस्तकांचा सुगंध, पानांचा स्पर्श आणि त्यातून घडणारे संवादी वाचन, जे मानवी मनाला शांतता देते, ते स्क्रीनवरील वाचनातून मिळत नाही. तसेच स्क्रीनच्या अति वापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत.
वाचन प्रेरणा दिनाचे उद्दिष्ट जर खऱया अर्थाने साध्य करायचे असेल तर केवळ उपदेश करून किंवा भाषणे ठोकून चालणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला, कुटुंबापासून ते शासनापर्यंत सर्वांनाच सक्रिय पावले उचलावी लागतील. मुले ही अनुकरणप्रिय असतात. जर घरात आई-वडील सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतील, टीव्ही पाहत असतील तर मुले पुस्तकांकडे कधीच वळणार नाहीत. पालकांनी स्वतः मुलांसमोर वाचन केले पाहिजे. घरात दररोज किमान एक तास मोबाईल, टीव्ही पूर्णपणे बंद पाळला गेला पाहिजे. या वेळेत कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून पुस्तके वाचावीत किंवा त्यावर चर्चा करावी. मुलांच्या वाढदिवसाला महागडी खेळणी देण्याऐवजी त्यांच्या आवडीची पुस्तके भेट देण्याची सवय लावावी.
शैक्षणिक संस्थांनी जबाबदारी ओळखून शाळा आणि महाविद्यालयांनी केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता वर्षभर वाचन उपक्रम राबवले पाहिजेत. प्रत्येक शाळेत दर या आठवडय़ाला किमान एक ते दोन तास ‘सक्तीचा वाचन तास’ असावा, जिथे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतिहास, विज्ञान, चरित्र, कथा-कादंबऱया यांसारखी अवांतर पुस्तके वाचली जातील. ग्रंथालयांना केवळ कपाटात बंद पुस्तकांचे घर न ठेवता ती खुली आणि डिजिटल सोयींनी युक्त केली पाहिजेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तक परीक्षणाचे गृहपाठ द्यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढेल.
आपण लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा इतर काwटुंबिक आणि सामाजिक सणांना कोटय़वधी रुपये खर्च करतो आणि एकमेकांना निरुपयोगी वस्तू भेट देतो. त्याऐवजी समाजात ‘ग्रंथभेट’ देण्याची नवी संस्पृती रुजली पाहिजे. प्रत्येक वसाहतीमध्ये, सोसायटीमध्ये लहान मुलांसाठी ‘कम्युनिटी लायब्ररी’ सुरू करता येऊ शकते.
सार्वजनिक वाचनालयांचे आधुनिकीकरण करायला हवे. गावागावांतील आणि शहरांतील सार्वजनिक वाचनालये आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने आणि दानशूर व्यक्तींनी या वाचनालयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ही वाचनालये केवळ जुन्या पुस्तकांचे गोदाम न राहता तिथे तरुणांना आकर्षित करतील अशा सोयीसुविधा, इंटरनेट, ई-लायब्ररी आणि अभ्यासासाठी शांत वातावरण निर्माण केले पाहिजे.
आजच्या पिढीला आकर्षित करेल असे दर्जेदार आणि सोप्या भाषेतील साहित्य निर्माण करणे ही लेखक आणि प्रकाशकांची जबाबदारी आहे. आजच्या काळातील विषय, तरुणांचे प्रश्न, विज्ञान-तंत्रज्ञान यांवर मराठीत दर्जेदार पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. तसेच पुस्तकांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा असणे गरजेचे आहे.
‘वाचाल तर वाचाल’ हा केवळ भिंतीवर लावायचा सुविचार नाही, तर ते मानवी संस्पृतीच्या अस्तित्वाचे त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्या समाजाची वाचन संस्पृती संपते, त्या समाजाची विचार करण्याची, विश्लेषण करण्याची आणि प्रश्न विचारण्याची क्षमता नष्ट होते. असा समाज अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीच्या विचारसरणीचा बळी ठरतो. वाचन हे केवळ अक्षरांचे संकलन नाही, तर ती माणसाची संवेदनशीलता, सहानुभूती आणि नैतिकता टिकवून ठेवण्याची एक अखंड प्रक्रिया आहे.
वाचन प्रेरणा दिन हा केवळ डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्याचा औपचारिक दिवस नाही, तर तो आपल्यातील वाचक जिवंत ठेवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. मोबाईल आणि तंत्रज्ञान हे आपले गुलाम असायला हवेत, आपण त्यांचे गुलाम बनू नये याचे भान ठेवणे म्हणजेच वाचन प्रेरणा दिन साजरा करणे होय.






























































