
>> मारुती नवलाई
पहाटेच्या अंधारात शहरातील रस्ते शांत असतात, बाजारपेठा बंद असतात; मात्र वृत्तपत्र विव्रेत्यांची धावपळ सुरू झालेली असते. वृत्तपत्रांचे गठ्ठे स्वीकारणे, त्यांची वर्गवारी करणे आणि ती घरोघरी पोहोचवणे या कामात त्यांची सकाळ उजाडते. ऊन, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता वाचकांच्या हातात रोजचे वृत्तपत्र देणारा हा कष्टकरी घटक लोकशाहीच्या माहितीप्रवाहातील महत्त्वाचा दुवा आहे.
वृत्तपत्र म्हणजे समाजाचा आरसा. राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा आणि देशविदेशातील घडामोडींची माहिती वृत्तपत्रांतून वाचकांपर्यंत पोहोचते. मात्र ही माहिती घराघरांत पोहोचवणाऱ्या विव्रेत्यांच्या कष्टांची दखल किती घेतली जाते, हा प्रश्न आहे. वृत्तपत्रांच्या पानांवर अनेकांच्या कार्याची चर्चा होते, पण ती पाने वाचकांपर्यंत पोहोचवणाऱया विव्रेत्यांच्या आयुष्यातील संघर्ष मात्र दुर्लक्षित राहतो.
वाढता प्रवासखर्च, इंधनाचे दर, पहाटेच्या वेळेतील शारीरिक कष्ट, वितरणातील अडचणी आणि मर्यादित उत्पन्न यांचा सामना वृत्तपत्र विव्रेत्यांना दररोज करावा लागतो. त्यात घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी असते. अनेक वर्षे हा व्यवसाय करणाऱया विव्रेत्यांसमोर वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेचाही प्रश्न उभा राहतो.
डिजिटल माध्यमांचा विस्तार होत असला तरी छापील वृत्तपत्रांचे महत्त्व अद्याप कायम आहे. विश्वासार्ह माहिती, स्थानिक घडामोडी आणि विविध विषयांवरील सविस्तर वृत्तांकनासाठी वृत्तपत्रांना वाचक पसंती देतात. या वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवण्याचे काम विव्रेते करतात. त्यामुळे वृत्तपत्र उद्योगाच्या आर्थिक आणि सामाजिक साखळीत त्यांचे स्थान दुर्लक्षित करून चालणार नाही.
वृत्तपत्र विव्रेत्यांना अपघात विमा, आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आणि वृद्धापकाळासाठी आर्थिक आधार मिळणे आवश्यक आहे. त्यांची अधिकृत नोंदणी करून पात्र विव्रेत्यांपर्यंत शासकीय कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवले पाहिजेत. यासाठी शासन, वृत्तपत्र व्यवस्थापन, वितरक आणि विव्रेता संघटनांनी समन्वयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विव्रेत्यांच्या प्रश्नांकडे केवळ व्यवसायाचा भाग म्हणून न पाहता त्यांच्या श्रमाचा आणि सामाजिक योगदानाचा विचार झाला पाहिजे. त्यांना संघटितपणे आपल्या मागण्या मांडता याव्यात यासाठी संघटनांनीही पुढाकार घ्यावा. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना विव्रेत्यांच्या रोजगाराचे आणि उपजीविकेचे संरक्षण करण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
15 ऑक्टोबर हा ‘वृत्तपत्र विव्रेता दिन’ म्हणजे या कष्टकरी घटकाच्या योगदानाची जाणीव करून देणारा दिवस. केवळ शुभेच्छा देऊन किंवा सत्कार करून जबाबदारी संपत नाही. त्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. सकाळी प्रत्येकाच्या दारात बातम्या पोहोचवणाऱया विव्रेत्याच्या स्वतःच्या आयुष्यात सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रकाश पोहोचला पाहिजे.
लोकशाहीत माहितीला महत्त्व आहे आणि ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वृत्तपत्र विव्रेत्यांना आरोग्य, अपघात संरक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आणि वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळणे, ही केवळ अपेक्षा नसून त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्याची गरज आहे.
वृत्तपत्र विव्रेता हा केवळ वर्तमानपत्र विकणारा नसतो, तो लोकशाहीचा पहाटेचा शिलेदार असतो. त्याच्या कष्टांना सन्मान आणि कुटुंबाला सुरक्षित भविष्य मिळाले तरच ‘वृत्तपत्र विव्रेता दिना’चा खरा अर्थ साध्य होईल.






























































