
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सर्व्हिस रायफलसह एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. बशीर अहमद (वय ५५) असे बेपत्ता अधिकाऱ्याचे नाव असून, ते त्रिगाम पोलीस चौकीत तैनात होते. गुरुवारी सकाळपासून त्यांचा शोध लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोधासाठी अनेक पथके तयार केली आहेत.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार बशीर अहमद हे त्रिगाम येथील रहिवासी आहेत. ते सर्व्हिस रायफलसह बेपत्ता झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. विविध संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, ते नेमके कोणत्या परिस्थितीत बेपत्ता झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणजेच एसपीओ स्थानिक पातळीवर नियुक्त केलेले सहाय्यक कर्मचारी असतात. दहशतवादविरोधी मोहिमा, डोंगराळ आणि सीमावर्ती भागांतील सुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ते नियमित पोलीस दलाला मदत करतात. दुर्गम आणि दहशतवादग्रस्त भागांतही त्यांची नियुक्ती केली जाते.



























































