
मंडणगड तालुक्यातील वेरळ तर्फे वेसवी या गावातील ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाचे महत्त्व ओळखून श्रमदानातून खलाटातील विहिरीजवळ गोठण या ठिकाणी शुक्रवारी ३ वनराई बंधारे यशस्वीरित्या बांधले ग्रामस्थांच्या या कौतुकास्पद मोहीमेच्या कामाचे देव्हारे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
देव्हारे परिसरातील उमरोली ग्रुप ग्राम पंचायत ही अतिशय महत्त्वाची अशी ग्राम पंचायत आहे. या उमरोली ग्रुप ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वेरळ तर्फे वेसवी गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी मिळून श्रमदान करत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावातून वाहणाऱ्या एका नदीवर शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी प्रत्येकी २० फुट लांबीचे वनराई प्रकारचे ठिक ठिकाणी एकुण तीन बंधारे बांधून पावसाळ्यानंतर भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी महत्त्वाचे काम केले आहे.
वेरळ तर्फे वेसवी येथील स्थानिक ग्रामस्थांनी कोणत्याही सरकारी निधीची किंवा मोठ्या यंत्रसामग्रीची वाट न पाहता, गावातील तरुण, महिला आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत स्वतःच्या मेहनतीने एकजूट आणि शश्रमदानातून हे बंधारे बांधले या महत कामासाठी मंडणगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे , आरोग्य विस्तार अधिकारी श्री.पारधी , उमरोली ग्राम पंचायत अधिकारी घनश्याम व्हरकुटे , वेरळ तर्फे वेसवी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयराम बोर्ले , महिला मंडळ अध्यक्षा रंजिता बोर्ले , उमरोली ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सरपंच दिपक बोर्ले ,बचत गट अध्यक्षा दिप्ती बोर्ले ,ग्राम पंचायत कर्मचारी वैभव बोबले आदींसह वेरळ तर्फे वेसवी येथील महिला पुरुषांची मोठी मदत झाली.
या वनराई बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन ते जमिनीत मुरण्यास मदत होईल, ज्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची (बोरवेल) पाणीपातळी वाढेल. अडवलेले पाणी गुराढोरांना पिण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील शेती आणि बागायतीसाठी उपयुक्त ठरेल. वरेळ तर्फे वेसवी या गावासह मंडणगड तालुक्यातील इतर गावे देखील अशा प्रकारे वनराई बंधारे बांधून जलसमृद्धीकडे वाटचाल करत आहेत हे तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे काम आहे.






























































