
गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचे तीव्र चटके आणि भीषण दुष्काळसदृश परिस्थितीने हैराण झालेल्या गोव्यासह सिंधुदुर्ग जिह्यातील नागरिकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहाटेच्या सुमारास सिंधुदुर्ग जिह्यातील काही भाग आणि गोव्यात विजांच्या लखलखाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि उकाडय़ामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आज पहाटे झालेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून पाण्यासाठी धडपडणाया नागरिकांना तसेच सर्वसामान्यांना तात्पुरता का होईना, दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे उकाडय़ापासून सुटका झाली असली तरी शेतकरी मात्र पिकांच्या सुरक्षेबाबत चिंताग्रस्त झाले आहेत.






























































