मी काय कॉण्ट्रॅक्टर आहे का? वृद्धाच्या मृत्यूवर महापौरांची असंवेदनशील प्रतिक्रिया, रोहित पवारांनी घेतला खरपूस समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात महापालिकेने ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सात ते आठ फूट खोल खड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना येरवडा येथील चित्रा चौक परिसरात घडली. प्रदीप परदेशी (वय – 69, रा. येरवडा) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर महापौर मंजूषा नागपुरे यांनी अत्यंत असंवेदनशील विधान करत मी काय कॉण्ट्रॅक्टर आहे का? असा सवाल केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

येरवड्यात ड्रेनेज वाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय – 69) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या अपघाताबाबत जाब विचारणाऱ्या माध्यमांनाच मी ठेकेदार आहे का? मी त्यांना ढकलून दिलं का? असे असंवेदनशील प्रतिप्रश्न करून महापौरांनी आपल्यातील संवेदनशीलताच संपल्याचे दाखवून दिले, अशी टीका रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून केली.

एका बाजूला शहराच्या प्रथम नागरिक म्हणून मिरवायचं आणि दुसऱ्या बाजूला अशी बेजबाबदार उत्तरे द्यायची, हे महापौरांना शोभणारे नाही. जबाबदारी झटकणारे असे असंवेदनशील महापौर वैचारिक शहर असलेल्या पुण्यनगरीला मिळणं, हे दुर्दैव आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

मी काय कॉण्ट्रॅक्टर आहे का? महापौरांचा प्रतिप्रश्न

‘मी काय कॉण्ट्रॅक्टर आहे का? मी त्या माणसाला ढकललंय का? मी गाडी चालवत होते का?’ असे प्रतिप्रश्न करीत महापौर मंजूषा नागपुरे यांनी येरवड्यातील ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूच्या घटनेवर असंवेदनशील प्रतिक्रिया देत जबाबदारी झटकली. महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून प्रदीप लक्ष्मण परदेशी यांचा मृत्यू झाला. याबाबत एका पत्रकाराने महापौरांना फोन करून प्रतिक्रिया विचारली असता, महापौरांनी पत्रकारालाच प्रतिप्रश्न केले. या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेमके काय घडले?

प्रदीप परदेशी हे भाजीमंडईकडे जात होते. चित्रा चौक परिसरात महापालिकेच्या वतीने ड्रेनेजचे काम सुरू होते. यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला आहे. खड्याच्या बाजूला बॅरिकेड्स लावले होते. परदेशी तेथून जात असताना समोरून आलेल्या रिक्षाचा धक्का त्यांना लागला. त्यामुळे तोल जाऊन ते खड्यात पडले. गंभीर जखमी परदेशी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, परदेशी यांचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना शनिवारी सायंकाळी मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ही घटना समोर आली. परदेशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती लक्ष्मीनगर पोलिसांनी दिली आहे.