मणिपूरवरून आजही गदारोळ; संसद ठप्प, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवेदन द्यावे, अशी आक्रमक मागणी आजही सर्वपक्षीय विरोधकांनी लावून धरली. मात्र सरकारने या मागणीपासून पळ काढल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. 

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी मणिपूरच्या विषयावरून घोषणाबाजी सुरू केली. यावेळी अध्यक्ष ओम बिर्ला विरोधी पक्षाच्या खासदारांवर संतापले. सरकारकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले, मात्र विरोधकांचे त्यामुळे समाधान झाले नाही. पुन्हा गदारोळ सुरू झाल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी अडीच व त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. 

राज्यसभेतही मणिपूर विषय गाजला. हा विषय गृहमंत्र्याच्या अखत्यारीत असल्याने तेच निवेदन करतील, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विरोधक अधिकच संतापले. पंतप्रधानांनी निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे कामकाज दुपारी 12 त्यानंतर 2 व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

स्कुली बच्चे जैसा मत करो 

राज्यसभेत आपचे खासदार राघव चड्डा यांच्यावर सभापती जगदीप धनखड चांगलेच भडकले. सभागृहात कोणी बोलत असताना दरवेळी तुम्ही उठून बोलता. सभागृहाचा मान राखा, शाळेतल्या मुलासारखे वागू नका, अशा शब्दांत धनखड यांनी फटकारले.