रिमझिम पावसाने नगरमधील रस्त्यांची दैना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यापूर्वी शहरातील आणि विशेषतः मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची महापालिका प्रशासनाने केलेली ‘वल्गना’ पुन्हा एकदा पावसात विरून गेली आहे. त्यातच आता आठवडाभरापासून पडत असलेल्या ‘रिमझिम’ पावसाने शहरातील बहुतांश रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, नागरिकांसह वाहनचालकांना मोठय़ा गैरसोयीचा सामना सध्या करावा लागत आहे. शहरातील ‘मॉडेल’ रस्त्यांपेक्षा डोंगरदऱयांतील आणि शेतशिवारातील रस्ते बरे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची वल्गना तत्कालीन आयुक्त शंकर गोरे यांनी केली होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रप्रपंचही करण्यात आला. कामे सुरू करण्याचीही तयारी झाली. मात्र, ही तयारी होता-होता विलंबाने आगमन झालेल्या पावसाला अखेर जुलैत सुरुवात झाली. मागील आठवडाभरापासून पडत असलेल्या रिमझिम पावसाने आधीच खड्डय़ांनी जर्जर झालेल्या रस्त्यांना सध्या दलदलीचे स्वरूप आले आहे. त्यातून चाचपडत, पडत-झडत, आदळत-आपटत वाहनधारक कसाबसा प्रवास करत आहेत.

ख्रिस्तगल्ली, माणिक चौक ते शनी चौक, नवी पेठ अशा बाजारपेठेतील रस्त्यावर झालेले मोठमोठे खाचखळगे, खड्डे, त्यात साचलेले पाणी, रस्त्यावर असलेली चिखल, माती आणि त्यामुळे माजलेली दलदल यामुळे अशा रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.

रिमझिम पावसानेच शहरातील रस्त्यांची आणि ड्रेनेजची पुरती ‘वाट’ लावली असून, मोठा पाऊस झाल्यास काय अवस्था असेल याची कल्पनाही न केलेली बरी. शहरातील बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. सर्वच रस्ते चिखल, मातीने माखले आहेत. मोठमोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणी साचून डबक्यांची साखळी तयार झाली आहे. रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झालेली असताना ड्रेनेज लाइनचाही पुरता बोजवारा उडाला आहे. निकृष्ट कामामुळे ड्रेनेज लाइनचे पाणी पिण्याच्या पाइपलाइनमधून सप्लाय होण्याचे प्रकार सुरू आहेत. तर, ड्रेनेज लाइन ओव्हर फ्लो होऊन सांडपाण्याचे कारंजे उडण्याचा प्रकारही अक्षता गार्डनसमोरील कॉर्नरवर दररोज दिसून येत आहे.

डासांचे साम्राज्य; फवारणी कधी

  • पावसाने रस्ते, चौक दलदलयुक्त बनले असून, उपनगरासह शहराच्या काही भागांत मोठय़ा प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी डासांचे साम्राज्य बनले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी धूळ फवारणी करण्याची गरज आहे. मात्र, ते कधी हाच प्रश्न नगरकरांना सतावत आहे.

दहा कोटींच्या निधीतील रस्त्यांच्या कामाचा बोजवारा

  • शहरातील दहा कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांच्या कामाचा बोजवारा उडाला असून, चितळे रोड ते दिल्ली गेट हा महत्त्वाचा रस्ता अर्धवट अवस्थेत सोडणाऱया ठेकेदारांवर अद्यापपर्यंत कोणताच निर्णय महापालिकेमध्ये न घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. चितळे रोड, नेताजी सुभाष चौक, गांधी मैदान परिसर, नवी पेठ, माणिक चौक, जुनी महानगरपालिका या ठिकाणी असलेले हे रस्ते न झाल्यामुळे याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.