
टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने ऐन सणासुदीत ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. स्वस्त किंमतीत मिळणारे एकूण पाच रिचार्ज प्लॅन्स कंपनीने तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही रिचार्जच्या किंमती थेट 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅनसाठी आता ग्राहकांना थेट 349 रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशावर थेट 16 टक्क्यांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
एअरटेलने दररोज 1.5 जीबीडेटा आणि अमर्याद कॉलिंग सुविधा देणारे सर्व लोकप्रिय प्रिपेड प्लॅन्स पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता दररोज अधिक डेटा असणाऱ्या आणि महागडय़ा प्लॅन्सचा पर्याय निवडावा लागणार आहे. एंट्री-लेव्हलचे 199 आणि 219 चे प्लॅन्स कंपनीने पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले आहेत. प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न अर्थात एआरपीयू वाढवून कंपनीचा भर आपल्या ‘सरासरी उत्पन्नात’ सुधारणा करण्यावर आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एयरटेलचा एआरपीयू 264 वर पोहोचला असून, तो टेलिकॉम उद्योगात सर्वाधिक आहे. जून तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 37.3 टक्के वाढ होऊन तो 8,167 कोटी झाला आहे. भारती एअरटेलने दररोज 1.5 जीबी डेटा देणारे प्रिपेड प्लॅन्स बंद करून अप्रत्यक्षपणे 16 टक्क्यांपर्यंत दर वाढवल्यानंतर, आता व्होडाफोन-आयडियादेखील दर वाढवण्याची शक्यता आहे.
बंद प्लॅन जीबी वैधता
299 रुपये 1.5 जीबी 28 दिवस
319 रुपये 1.5 जीबी 30 दिवस
579 रुपये 1.5 जीबी 56 दिवस
619 रुपये 1.5 जीबी 60 दिवस
649 रुपये 2 जीबी 56 दिवस































































