वेधक – लोकाभिमुख उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

लोकाभिमुख, संवेदनशील आणि नागरिक केंद्रित पोलिसिंगची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम सध्या लातूर जिल्हा पोलीस दल करत आहे. लातूर येथील जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये जिह्यातील 10 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱया 319 सोसायटय़ांमध्ये पोलीस भेटी देणार असून त्यांच्या समस्यांची माहिती घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शहरी भागातील नागरिकांसाठी ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे 15 जून ते  31 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत जिह्यातील विविध शहरांमधील निवासी सोसायटय़ा, कॉलनी आणि नागरी वसाहतींमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्रारी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी लातूर जिल्हा पोलीस दलाने ‘पोलीस शेतकऱयांच्या बांधावर’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱयांच्या बांधावर पोहोचले होते. शेतीचे रस्ते, शेतजमिनीचे वाद, पाणी वाटप, अतिक्रमण, शेजारील वाद तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करून अनेक समस्या जागेवरच मार्गी लावण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱयांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वाढला. याच संकल्पनेचा विस्तार करत आता शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस अधिकारी थेट सोसायटय़ांमध्ये जाणार आहेत. वाढती गुन्हेगारी, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, सायबर फसवणूक, वाहतूक समस्या, पार्किंगची अडचण, ध्वनी प्रदूषण, अमली पदार्थांविषयी जागरूकता, शेजारील वाद, घरफोडी प्रतिबंध तसेच इतर कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे. या भेटीदरम्यान नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याबरोबरच त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम शांततापूर्ण आणि गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.