
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीने शुक्रवारी रात्री उशिरा कास गावातील राणेवाडी येथे पुन्हा एकदा उच्छाद मांडला. हत्तीने थेट मानवी वस्तीत शिरकाव करून दोन वाहनांची नासधूस केल्यामुळे संपूर्ण परिसरात कमालीची घबराट पसरली असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी रात्री ‘ओंकार’ने राणेवाडीत प्रवेश केल्यानंतर धुडगुस घालायला सुरुवात केली. हत्तीने शांताराम राणे यांच्या शेतात उभा असलेल्या ट्रक्टरवर हल्ला करून त्याचे मोठे नुकसान केले. त्यानंतर, गोविंद पेडणेकर यांच्या घराच्या पडवीत पार्क केलेली ओमनी कार फोडून धिंगाणा घातला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.


























































