
मुंबईत पूर्वी पाणी तुंबले की ठाकरेंमुळे तुंबले असा आरोप व्हायचा, झाड पडले की ठाकरेंमुळे पडले म्हणायचे, रस्ता खचला की ठाकरेंमुळे खचला अशी बोंब केली जात होती; पण यंदा मुंबई ठाकरेंमुळे नाही तर पावसामुळे तुंबली, अशी चपराक शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी आज महायुती सरकारला लगावली. ठाकरेंच्या हातात मुंबई होती तेव्हा मुंबईची कशी काळजी घेतली जात होती, हे पहिल्याच पावसाने यावेळी महाराष्ट्राला दाखवून दिले; त्यासाठी आपण पावसाला धन्यवाद देतो, असा टोला त्यांनी हाणला.
राज्यातील अतिवृष्टीवरून विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेमध्ये भास्कर जाधव यांनी सरकारला धू-धू धुतले. विधानसभा नियम १०१ अन्वये आपत्कालीन चर्चेमध्ये बोलताना त्यांनी मुंबईसह राज्यभरात झालेल्या नुकसानीचा पाढाच वाचला. ५ आणि ६ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या, पूल कोसळले. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला. मुंबईत मॅनहोल उघडे राहिल्याने मृत्यू झाले. चार दिवसांत एक हजार झाडे राज्यात उन्मळून पडली. संपूर्ण राज्यात पावसाचा हाहाकार माजला आहे. वसई–विरारमध्ये कोणताही संपर्क राहिलेला नाही. वीज नाही, मोबाईल नेटवर्क नाही, रस्ते-घरे पाण्याखाली गेली. वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकांचे खाण्यापिण्याचे वांधे झाले. दूध पुरवठाही होत नाही. अत्यंत भीतीचे वातावरण आहे. आमच्याकडे कोणी बघणार की नाही, असे लोक म्हणताहेत. अधिवेशन सुरू असताना त्यातून आमच्या ज्या गरजा आहेत, संकटे आहेत, त्यांना वाचा कोणी फोडणार की नाही, अशा अपेक्षेने लोक लोकप्रतिनिधींची वाट पाहत आहेत, अशी विदारक परिस्थिती भास्कर जाधव यांनी मांडली.
मिसिंग लिंक सर्व देशांत फिरायला गेला होता का?
मिसिंग लिंक पुलाचे डिझाईन कॅनडात तयार करण्यात आले, महत्त्वाच्या चाचण्या डेन्मार्कमध्ये पार पडल्या, अग्निशमन सुरक्षेच्या चाचण्या स्पेनमध्ये झाल्या, केबलचे उत्पादन मलेशियात झाले, पुलाचे आरेखन तैवानमध्ये झाले आणि केबलतज्ज्ञ सिंगापूरमधून सहभागी झाले. हा मिसिंग लिंक काय एवढ्या सर्व देशांत फिरायला गेला होता का? कारण काहींचे सारखे परदेशात अंतर्गमन-बहिर्गमन सुरूच असते, अख्खा देश बघतोय, त्यातलाच हा प्रकार आहे बहुतेक, असा चिमटा भास्कर जाधव यांनी काढला.
हे कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी
आता ज्या भागात पाऊस झाला नाही तिथे अतिवृष्टी होऊ शकते. असे होऊ नये. पण संकट आलेच तर काय तयारी केली आहे, ते सरकारने महाराष्ट्राला सांगावे. कर्नाळा खिंडीत चढताना १५-१६ ठिकाणी स्पीडब्रेकर. कराडमार्गे पुण्याला आल्यानंतर कात्रज घाटाला बायपास काढलाय, त्याला टनेल आहे; त्यातून बाहेर आल्यानंतर सयाजी हॉटेलपर्यंत रम्बलर टाकलेत. त्यांची संख्या एक हजारच्या खाली होणार नाही. हे सर्व कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी करतोय का, असा सवाल जाधव यांनी केला.





























































