
मुंबईत गेल्या आठवडय़ात पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. अशातच आता झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांवरून पुन्हा एकदा दोघांतील मतभेद दिसून आलेत. मुंबईतील रस्ते आणि पदपथांच्या वाढत्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळेच झाडे कमकुवत होऊन पडत असल्याचा थेट आरोप महापौर रितू तावडे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी काँक्रीटीकरणामुळे झाडे पडत नसल्याचा दावा केला होता. मात्र काँक्रीटीकरणामुळेच झाडे पडत असल्याची कबुली महापौरांनी दिल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 830 हून अधिक झाडे पडली आहेत. अवघ्या 5-6 दिवसांत एवढय़ा मोठय़ा संख्येने झाडे पडल्याने काँक्रीटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला. बुधवारी माध्यमांशी बोलताना महापौर रितू तावडे यांनी झाडे पडण्याच्या घटनांसाठी काँक्रीटीकरणाला जबाबदार धरले. झाडे पडण्यासाठी केवळ मान्सूनपूर्व वृक्षांची छाटणी नीट न होणे हेच कारण नसून, सिमेंटचे वाढते जाळे झाडांच्या मुळावर उठले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘काँक्रीट झाडांच्या मुळांपर्यंत घट्ट केल्याने झाडांना इजा झालेली आहे. झाडांना श्वास घेता येत नाहीये, झाडांमध्ये पाणी मुरत नाहीये. झाडांभोवती संरक्षणासाठी चौकोन तयार करायला हवा आणि झाडांखाली माती असायला हवी जेणेकरून पाणी खाली जाईल,’ असे महापौरांनी म्हटले. पण आयुक्त अश्विनी भिडे यांनी काँक्रीटीकरणाने सरसकट झाडे पडतात, असे म्हणता येणार नाही, असा दावा केला आहे. बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी फक्त सिमेंट क्राँकीटने नव्हे तर जोरदार वाऱयांमुळे झाडे पडल्याचे आज म्हटले. यावरून प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात मतभेद दिसून आले आहेत.





























































