बिहारमध्ये वीज पडून 18 जणांचा मृत्यू, गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस

बिहारमध्ये पाटणासह विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, या पावसात गेल्या 24 तासांत वीज पडून किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतासमध्ये सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला. आरवलमध्ये चार, सारणमध्ये तीन, औरंगाबाद आणि पूर्व चंपारणमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. तर बांका आणि वैशाली जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना दिल्या आहेत. खराब हवामानात लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. विशेषत: ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.