घरोघरी जाऊन सांगा, मोदी आले होते! दोन टप्प्यांतील मतदानानंतर भाजप अस्वस्थ

400 पार, आमच्याकडे मोदींचा चेहरा अशा कितीही वल्गना भाजप करीत असली तरी लोकसभा निवडणुकीतील दुसऱया टप्प्यातीलच मतदानानंतर भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था केविलवाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अस्वस्थ असल्याचे आज कोल्हापुरात पाहायला मिळाले. ‘गावागावात, घराघरात जाऊन लोकांना सांगा, मोदी आले होते,’ असे सांगण्याची वेळ मोदींवर आली.

मिंधे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील तपोवन मैदानावर शनिवारी सायंकाळी पंतप्रधान मोदींची सभा झाली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर तेच तेच आरोप केले. ‘कर्नाटकात एका रात्रीत मुसलमानांना ओबीसी बनविले. कर्नाटक व तामीळनाडू असा दक्षिण भारत नवा देश निर्माण करून देशाचे दोन तुकडे विरोधक करू इच्छितात,’ असा नवाच जावईशोध पंतप्रधानांनी लावला. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदी किती अस्वस्थ आहेत, हे सभेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या जनतेने पाहिले. ‘सभा संपल्यानंतर गावात जाऊन आप्तस्वकीय, मित्रमंडळींना भेटा आणि त्यांना सांगा, मोदी कोल्हापुरात आले होते. मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यायला सांगा,’ अशी विनंती त्यांनी केली.

फडणवीसांना शाहू महाराजांचा विसर

कोल्हापुरात सभा असूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विसर पडला. भाषणात फडणवीसांनी उल्लेख केला नाही, अभिवादन केले नाही. फडणवीसांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची अॅलर्जी का आहे? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

पत्रकारांचा ठिय्या

पत्रकारांना सभेच्या तीन तासआधी ऐनवेळी भाजप कार्यालयाकडून पास देण्यात आले. सभास्थळी मीडियासाठीच्या जागेवर भाजप पदाधिकारी बसले होते. त्यामुळे पत्रकारांनी जमिनीवर ठिय्या मांडला. त्यामुळे गोंधळ उडाला.