
स्वातंत्र्यदिनी येत्या 15 ऑगस्टला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. या वेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो. या वर्षी सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आली असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून 14 ऑगस्टला मंत्रालय व नवीन प्रशासकीय भवनाच्या सर्व खिडक्यांची तावदाने बंद करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केल्या आहेत.
परिपत्रकात काय म्हटले आहे…
सुरक्षिततेच्या दृष्टीने 14 ऑगस्टला कार्यालयीन वेळेनंतर मंत्रालय व नवीन प्रशासन भवनाच्या इमारतींमधील सर्व कार्यालयांच्या खिडक्यांची तावदाने बंद करावीत.
कार्यालयांची तपासणी करून घातपाताच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्याची माहिती मंत्रालयातील पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी. मंत्रालयातील सर्व विभागांनी या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमासाठी केवळ परवानगी असलेल्या अति महत्त्वाच्या व्यक्तींना मुख्य प्रवेशद्वारातून तर इतर अधिकारी आणि नागरिकांना उद्यान प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात यावा.






























































