
बैल घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपून मशागत करणाऱया काशीनाथ गायकवाड यांच्या व्यथेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी लातूरच्या जिल्हाधिकाऱयांना गायकवाड यांना तातडीने मदत देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच प्रशासन थेट गायकवाड यांच्या बांधावर बैल घेऊन हजर झाले. मशागतीसाठी बैल आणि त्यासोबत 32 हजार रुपयांची आर्थिक मदतही त्यांना देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काशीनाथ गायकवाड यांच्या व्यथेची तातडीने दखल घेतली. वीज पडून जनावर दगावल्यानंतर मदत का करण्यात आली नाही, अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांनी केली. लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बस्तेवाड यांना तातडीने आर्थिक मदत आणि मशागतीसाठी बैल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच जिल्हाधिकाऱयांनी देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना काशीनाथ गायकवाड यांच्या शेतावरच मदत घेऊन पाठवले. गोशाळेतून एक बैल त्यांना मशागतीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यासोबत आपत्ती व्यवस्थापनातून 32 हजार रुपयेही देण्यात आले. तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल काशीनाथ गायकवाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.






























































