इंग्लंडची विजयगर्जना, बांगलादेशी वाघांचा 137 धावांनी धुव्वा

सलामीलाच हार सहन कराव्या लागणाऱया इंग्लंडच्या सिंहानी बांगलादेशी वाघांसमोर विजयगर्जना दिली. डेव्हिड मलानच्या 140 धावांच्या स्फोटक खेळीमुळे इंग्लंडने 9 बाद 364 असे धावांचे शिखर उभे केले होते तर बांगलादेशी वाघ 227 धावांतच गळपटले आणि इंग्लंडने अपेक्षेनुसार आयसीसी वर्ल्ड कपमध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले.

 इंग्लंडचे 365 धावांचे आव्हान बांगलादेशला झेपणार नाही, हे रीक टॉपलेने  आपल्या पहिल्याच षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर तंझिद हसन (1) आणि नजमुल शांतो (0) यांना बाद करून स्पष्ट केले. 4 बाद 49 नंतर लिटन दास (76) आणि मुशफिकर रहिम (51) यांनी पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागी रचली. ही जोडी फुटल्यानंतर बांगलादेशने केवळ 49 व्या षटकापर्यंत आपली फलंदाजी ताणत पराभवाची औपचारिकता पूर्ण केली. टॉपलेने 43 धावांत 4 विकेट घेतले.

इंग्लंडच्या डावात मलानने जॉनी बेअरस्टॉसह 115 धावांची सलामी दिली तर ज्यो रुटबरोबर 151 धावांची भागी केली. मलानने आपल्या 23 व्या सामन्यांत 91 चेंडूंत सहावे शतक साजरे केले. जॉनी (52) आणि ज्योने (82) दमदार अर्धशतके ठोकली. त्यानंतर पुढील 13 षटकांत इंग्लंडला 98 धावाच काढता आल्या. आठपैकी एकाही फलंदाजाला 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही. बांगलादेशच्या शोरीफुल इस्लामने तीन तर मेहेदी हसनने 71 धावांत 4 विकेट टिपल्या.