Cricket world cup 2023 पाकिस्तान जिंकावा यासाठी इंग्लंड, नेदरलँड आणि श्रीलंकेची प्रार्थना

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (Cricket world cup 2023) आता अधिकच रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. आज पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामना होणार आहे. आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. एकीकडे पाकिस्तान कोमात आहे तर न्यूझीलंडचे एक पाऊल उपांत्य फेरीत. पण जर पाकिस्तानने आपल्या लौकिकास साजेसा जिगरी खेळ दाखवला तर ते पुन्हा शुद्धीत येतील आणि पुन्हा सुरू होईल जरतरचे समीकरण. जो हरेल तो स्पर्धेबाहेर आणि जो जिंकेल तो स्पर्धेत कायम. या सामन्याचा निकाल काय लागतोय याकडे पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या चाहत्यांचे लक्ष लागलेलेच आहे शिवाय तीन क्रिकेट संघांचेही लक्ष लागलेले आहे. इंग्लंड, नेदरलँड आणि श्रीलंका हे तीनही संघ या सामन्यात पाकिस्तान जिंकावा अशी प्रार्थना करत आहेत.

हा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे मात्र त्यावर आणखी तीन संघांचे भवितव्य अवलंबून आहे. जर न्यूझीलंडने विजय मिळवला तर पाकिस्तानसह आणखी तीन संघांचा विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा प्रवास संपुष्टात येईल. यात गतविजेत्या इंग्लंडबरोबरच श्रीलंका आणि नेदरलँड्सचाही समावेश आहे. त्यामुळेच हे तिन्ही संघही पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करत असतील. हिंदुस्थानी संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उर्वरीत तीन जागांसाठी अजूनही संघर्ष सुरू आहे. न्यूझीलंडच्या विजयानंतर तीन स्थानांसाठी केवळ चारच दावेदार उरतील. ज्यात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे आव्हान जवळजवळ संपुष्टात होते. दुसरीकडे न्यूझीलंडने सलग सात विजय मिळवत आधीच उपांत्य फेरी गाठली होती. पण अखेरच्या साखळी लढतीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी पराभव केला होता. त्या सामन्याची पुन्हा एकदा आठवण बंगळुरूत ताजी होणार आहे. एकीकडे पाकिस्तानात कोमात आहे तर न्यूझीलंडचे एक पाऊल उपांत्य फेरीत. पण जर पाकिस्तानने आपल्या लौकिकास साजेसा जिगरी खेळ दाखवला तर ते पुन्हा शुद्धीत येतील आणि पुन्हा सुरू होईल जरतरचे समीकरण. जो हरेल तो स्पर्धेबाहेर आणि जो जिंकेल तो स्पर्धेत कायम. निकाल काय लागतोय याकडे सर्वांचे लक्ष लागणारच.

पाकिस्तानला सलग चार पराभवानंतर बांगलादेशने प्राणवायू दिला होता. त्या विजयामुळे पाकिस्तानच्या हृदयाची धडधड कायम राहिली आहे. ती धडधड वाढवण्यासाठी पाकिस्तान जिवाचे रान करणार यात शंका नाही. पण दुसरीकडे सलग चार विजयांनंतर न्यूझीलंडचा संघ अक्षरशः कोलमडला आहे. सलग तीन पराभवांनी त्यांचे होत्याचे नव्हते झालेय. त्यातच त्यांचे एकेक योद्धे जखमी होऊन स्पर्धेबाहेर फेकले गेलेत. त्यामुळे न्यूझीलंडची अडचण खूप वाढलीय.
दोघांची बलस्थाने फलंदाजीच

न्यूझीलंडचे गोलंदाजी उत्तम असली तरी त्यांची फलंदाजी ही त्यांची ताकद आहे. पाकिस्तानबाबतही असेच बोलता येईल. गोलंदाजी त्यांचे मुख्य अस्त्र असले तरी फलंदाजांनीच त्यांची लाज राखली आहे. मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक या दोघांनीच शतके ठोकलीत आणि 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि सऊद शकील धावांसाठी झगडत आहेत. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, डेव्हन कॉन्वे आणि विल यंग यांनी चांगल्या खेळय़ा करून डावाला बळकटी दिलीय. दोघांकडेही अचूक मारा आहे, पण तो मारा गेल्या काही सामन्यांत बोथट झालाय. आपल्या माऱयाला धार लावण्यात जो यशस्वी ठरेल तोच पुढे चाल करेल.

इंग्लंडचा खुर्दा पाडण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

खचलेल्या इंग्लंडचा खुर्दा पाडत आपले उपांत्य फेरीतील स्थान बळकट करण्याचे ध्येय समोर ठेवूनच ऑस्ट्रेलिया आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध उतरणार आहे. पाच पराभवांमुळे इंग्लंडचे आव्हान जवळडळ संपुष्टात आले असून त्यावर ऑस्ट्रेलिया शिक्कामोर्तब करणार आहे.

तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला सळो की पळो करून सोडणाऱया इंग्लंडचा संघ 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने जसे शहर खचते तसा खचला आहे. यातून त्यांना नव्या उभारीची किंचितही शक्यता नाही. तरीही गतजगज्जेता आपला शेवट गोड व्हावा म्हणून पुन्हा एकदा आपले सर्वस्व पणाला लावून खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत खेळणार असल्यामुळे त्यांचीही काही धाकधूक वाढली आहे. कारण हे दोघेही मॅचविनर उद्या नसल्यामुळे त्यांच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम निश्चितच जाणवणार आहे. या विजयामुळे इंग्लंडचे भाग्य फळफळणार नसले तरी ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यांना पुढील दोन लढतींत अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघाशी खेळायचे असल्यामुळे त्यांचा उपांत्य प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात लढत रंगू शकते.