हिंदुस्थान, न्यूझीलंड, आफ्रिका टॉप थ्री , चौथ्या जागेसाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघात चुरस

विश्वचषकात आतापर्यंत हिंदुस्थानसह, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकन या संघांनी सर्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघांचे उपांत्य फेरीचे तिकीट आतापासूनच निश्चित मानले जात आहे. पण चौथ्या जागेसाठी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चुरस रंगण्याची दाट शक्यता आहे.

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये काही संघांनी जोरदार कामगिरी केली आहे, तर काही संघांची कामगिरी अपेक्षेपेक्षा अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे अशा संघांचे आव्हान आताच संकटात सापडले आहे.

यजमान आणि या वर्ल्ड कपचा संभाव्य विजेता असलेल्या हिंदुस्थानने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संघांचा सहज पराभव करत 6 गुणांसह अव्वल स्थान संपादले आहे. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी किमान 6 विजय अपेक्षित असतात आणि हिंदुस्थानला अद्याप सहा सामने खेळावयाचे आहे. त्यात बांगलादेश, नेदरलॅण्ड्स, श्रीलंकासारख्या दुबळय़ा संघांशी भिडायचे आहे. सहापैकी हिंदुस्थानचे 3 विजय निश्चित असल्यामुळे हिंदुस्थानने आपले उपांत्य फेरीत स्थान आताच निश्चित केले आहे. हिंदुस्थानपाठोपाठ न्यूझीलंडचा संघही याच स्थितीत आहे. त्यांनी 3 विजय मिळवले असले तरी तिन्ही विजय नेदरलॅण्ड्स, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दुबळय़ा संघांविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक केल्यामुळे त्यांना पुढील सहा सामन्यांत तुल्यबळ संघांशी भिडावे लागणार आहे. पण त्यांच्यासाठी 6 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवणे कठीण नाही. या दोन संघांपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघांना नमवून आपलेही उपांत्य फेरीत आव्हान मजबूत केले आहे.

आतापर्यंत साखळीतील केवळ 14 लढती झाल्या असून कोणत्याही संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित मानले जाऊ शकत नाही. तसेच केवळ एक विजय मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या माजी जगज्जेत्या संघांना दोन पराभवानंतरही अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्याची संधी आहे. हे संघ आता तळाला असले तरी पुढील सर्व सामन्यांत विजय मिळवून त्यांना स्पर्धेत राहता येऊ शकेल. त्यामुळे हिंदुस्थान आणि न्यूझीलंड अव्वल दोन संघांत असले तरी त्यांना आपले स्थान पक्के करण्यासाठी पुढील तिन्ही लढती जिंकून दाखविल्या तर त्यांच्या उपांत्य फेरी प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल. ऑस्ट्रेलियाने सलग दोन पराभवांनंतर आज श्रीलंकेचा पराभव करून आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. पण श्रीलंकेच्या पराभवाच्या हॅटट्रिकमुळे त्यांचे स्थान आता डळमळीत झाले आहे. आता त्यांच्या स्थानाला केवळ सलग सहा सामन्यांतील विजयच वाचवू शकतो.

मला पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसची काळजी वाटतेय. मिसबाह उल हक प्रशिक्षक असताना यो-यो टेस्ट आणि अन्य टेस्ट व्हायच्या. या प्रोफेशनल क्रिकेटपटूंची महिन्यातून एकदा तर टेस्ट व्हायलाच हवी. अन्यथा , पराभवांचा सामना (हिंदुस्थानसारखा) करावाच लागणार- वसीम अक्रम, माजी गोलंदाज