
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर कोकणवासीयांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेसच्या रूपात नवीन गाडी उपलब्ध झाली. गुरुवारी मध्य रेल्वेकडून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) मोठ्या संख्येने हजेरी लावून ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. या नव्या गाडीचे स्वागत करतानाच, दादर-रत्नागिरी पॅसेंजर वेळीच पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेकडे केली.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी सीएसएमटी ते सावंतवाडी रोड यांसारख्या अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत आणि उपनेते बाबी देव यांनी वारंवार केली होती. शिवसेनेने याबाबत संसदेतही आवाज उठवला. अखेर ही मागणी मान्य करत रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते सावंतवाडी दैनंदिन एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून तिचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी, खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजेश श्रीवास्तव यांची भेट घेतली. नव्या गाडीची सेवा सुरू झाल्याबद्दल महाव्यवस्थापकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच गाडीची मुंबईतून सुटण्याची वेळ रात्रीची ठेवण्यात यावी आणि राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकावरही तिला थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी गाडीचे जल्लोषी स्वागत करत रेल्वे स्थानकावर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, शिवसेना उपनेते बाबी देव, रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सहकार्याध्यक्ष योगेश जाधव आदी उपस्थित होते.
चौपट भाडे आकारणीला शिवसेनेचा तीव्र विरोध
पूर्वी मुंबईहून सावंतवाडीला जाण्याचे तिकीट ७० रुपये होते; मात्र नव्या गाडीचे भाडे जवळपास चौपटीने अधिक म्हणजेच २५० रुपये करण्यात आले आहे. या चौपट भाडे आकारणीला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला असून तातडीने तिकीट दरांमध्ये सुधारणा करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
पक्षपाती भूमिकेवर शिवसैनिक आक्रमक
शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर सुरू झालेल्या नवीन गाडीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून झाला. यादरम्यान मध्य रेल्वेनेही जाहिरातींवर शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावांचा उल्लेख डावलल्यामुळे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या या पक्षपाती भूमिकेचा तीव्र निषेध केला.




























































