पश्चिम विभाग सुस्साट, पूर्व विभागाची दमदार विजयी सलामी 

देवधर करंडकाच्या सलामीच्या सामन्यात पश्चिम विभागाने उत्तर पूर्व विभागाचा 9 विकेटस्नी धुव्वा उडवला, तर पूर्व विभागाने मध्य विभागाचे आव्हान सहजगत्या पार पाडत दमदार सलामी दिली. 

आजपासून पुद्दुचेरी येथे वेगवेगळय़ा तीन मैदानांवर सुरू झालेल्या देवधर करंडकाच्या एकदिवसीय स्पर्धेत पश्चिम विभागाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना उत्तर पूर्वची अक्षरशः धुळधाण उडवली. अरझान नागवासवाला, शम्स मुलानी आणि शिवम दुबेने उत्तर पूर्वच्या फलंदाजांना 47 षटकांत 207 धावांवर गुंडाळले. त्यानंतर हार्विक देसाई आणि प्रियांक पांचाल यांनी उत्तर पूर्व संघाच्या गोलंदाजीला पह्डून काढत 21 षटकांत 167 धावांची जबरदस्त सलामी दिली. हार्विक आणि प्रियांकचा झंझावात पाहाता दोघे शतक ठोकणार असे वाटत असतानाच हार्विक 85 धावांवर बाद झाला. त्याने 71 चेंडूंत 14 चौकारांचा वर्षाव करत ही खेळी साकारली. त्यानंतर प्रियांकने आपली षटकारचौकारांची आतषबाजी कायम ठेवली, पण तोसुद्धा शतक झळकवू शकला नाही. मात्र त्याने संघाला 25.1 षटकांत विजय मिळवून दिला. प्रियांकने आपल्या 69 चेंडूंतील 99 धावांच्या नाबाद खेळीत 7 षटकार आणि 7 चौकार ठोकले. 

पूर्व विभागाचा सहज विजय 

पूर्व विभागासमोरही मध्य विभाग 208 धावांचेच आव्हान उभारू शकला. मणिशंकर मुरासिंग, आकाश दीप आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी तीनतीन विकेटस् घेत मध्य विभागाला 207 धावांवरच रोखले. रिंकू सिंहने 63 चेंडूंत 54 धावा ठोकत संघाला द्विशतकासमीप नेले. त्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज धावांची चाळिशीही गाठू शकला नाही. मध्य विभागाने 50 षटके फलंदाजी केली, तर पूर्व विभागाने उत्कर्ष सिंहच्या 89 धावांच्या खेळीनंतरही विजयी लक्ष्य गाठण्यासाठी 47व्या षटकांपर्यंत फलंदाजी केली. त्यांनी हा सामना 6 विकेटस् राखून जिंकला. 

दक्षिण विभागाचा 185 धावांनी विजय 

रोहन कुन्नुमल, मयांक अगरवाल आणि नारायण जगदीशन यांच्या खणखणीत खेळींच्या जोरावर दक्षिण विभागाने 8 बाद 303 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. 304 धावांचा पाठलाग करताना उत्तर विभागाची 6 बाद 50 अशी केविलवाणी अवस्था झाली होती आणि तेव्हाच पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे तब्बल दीड तासाचा खेळ वाया गेल्यामुळे उत्तर विभागापुढे 28 षटकांत 246 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले, पण उत्तरेच्या संघाचा 60 धावांतच खुर्दा पडला. विद्वत कावेरप्पाने 17 धावांत 5 विकेटस् घेतल्या, तर विजयकुमार वैशाकने 8 धावांत 2 विकेटस् टिपत दक्षिण विभागाला 23 व्या षटकातच मोठा विजय मिळवून दिला.