अभिव्यक्ती- मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य

>> डॉ. मुकुंद कुळे

मुद्दुपलनीने 18व्या शतकात स्त्रालाही आपल्या लैंगिक भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे आपल्या कलाकृतीतून सांगितलं, तर मुद्दुपलनी आणि तिच्या राधिका सांत्वनमुला पुन्हा सन्मान मिळवून देण्यासाठी नागरत्नम्मा सनातन्यांशी शेवटपर्यंत लढत राहिली. याच राधिका सांत्वनमुच्या इंग्रजी अनुवादावरून केलेला स्वैर मराठी अनुवाद त्याच नावाने मेहता पब्लिकेशनने नुकताच प्रकाशित केला आहे. समाजात सध्या एकूणच धार्मिकसांस्कृतिक गलबला सुरू असताना मुद्दुपलनीच्या या काव्याकडे कुणाचं लक्ष जातं का ते पाहायला हवं.

कोणाही स्त्राr-पुरुषातला शृंगार, मग तो नवरा-बायकोतला असो वा या नात्यापल्याडचा असो, ती खासगी गोष्ट असली तरी एक सामाजिक कृती असते आणि साहजिकच या सामाजिक कृतीत दोघांचाही सक्रिय सहभाग खरं तर सारखाच असावा लागतो, पण कोणत्याही स्त्राr-पुरुष शृंगारातील प्रत्यक्ष परिस्थिती तशी असते का? तर ती तशी खचितच नसते. बहुतांश ठिकाणी पुरुषच वरचढ असतो, स्त्राrला व्यक्त होण्याचा सहसा काहीच अधिकार नसतो. मात्र अलीकडच्या काळात स्त्रिया आपला हा शृंगाराचा अधिकार वा समान हक्कही मागू लागल्या आहेत. अन्यथा हिंदुस्थानी परंपरेने तर सलज्जतेच्या नावाखाली स्त्रियांचा हा अधिकार एवढी वर्षे नाकारलाच होता आणि स्त्रियांनी कळत नकळत परंपरा म्हणून तो स्वीकारलाही होता. तरीही स्त्राrला मन असतं, तिला तिचं शरीर असतं आणि तिच्याही मनात शृंगाराच्या काही कल्पना असतात हे आजवर नि अद्यापही समाज स्वीकारार्ह नाही. म्हणून तर हिंदुस्थानी साहित्य परंपरेत पुरुषाने लिहिलेलं शृंगार साहित्य जसं सापडतं, तसं स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य सापडत नाही. मग ते ‘कामसूत्र’ किंवा ‘अनंगरंग रतिशास्त्र’सारखे लैंगिक शिक्षण देणारे ग्रंथ असोत वा ‘शुकबहात्तरी’सारखे शृंगारकथा रंगवणारे ग्रंथ असोत, ते पुरुषांनीच लिहिलेले आहेत. गेलाबाजार प्राचीन संस्कृत-प्राकृत नाटक वा काव्यांतून जे शृंगारचित्रण झालेलं दिसतं, तेही पुरुषांनीच केलेलं-लिहिलेलं आहे. त्या क्षेत्रात स्त्रियांचं नामोनिशाण दूरदूरपर्यंत कुठेही आढळत नाही… आणि म्हणूनच अठराव्या शतकात पार दक्षिणेकडील तंजावरच्या प्रतापसिंह भोसले राजांच्या दरबारातील विद्वान देवदासी मुद्दुपलनी (1730-1790) महत्त्वाची ठरते. तिने आपल्या ‘राधिका सांत्वनमु’ या तेलुगू भाषेतील काव्यग्रंथात कृष्ण, राधा आणि इला या त्रयीच्या माध्यमातून केवळ शृंगारकथा सांगितलेली नाही, तर शृंगारात स्त्राrने पुढाकार घेऊन वरचढ कसं ठरावं तेही सांगितलं आहे. कदाचित मुद्दुपलनीचं हे शृंगारकाव्य हिंदुस्थानी साहित्य परंपरेतील ‘आद्य शृंगारकाव्य’ ठरावं! दुसरं कुणी लिहिलेलं असेल तर माझ्या तरी ते पाहण्यात आणि वाचनात आलेलं नाही.

 मुद्दुपलनी हिने आपल्या ‘राधिका सांत्वनमु’ या काव्यग्रंथात प्रणयक्रीडेतील भावना जरा अधिकच मोकळेपणी मांडल्यात, पण कुणाही स्त्राr-पुरुषाच्या त्या सवयीच्या आहेत. फक्त खासगी शृंगारिक भाव थोडा थेट आक्रमकपणे आणि उघडपणे मांडलाय एवढंच! परंतु हिंदुस्थानी महाकाव्यांमध्ये अशा वर्णनांची कमतरता नाही. किंबहुना अभिजात वाङ्मयात शृंगार रसाला कायमच वरचं स्थान मिळालेलं आहे. शेवटी शृंगार ही सर्वाधिक महत्त्वाची नैसर्गिक भावना आहे. तसंच काव्य निर्मिती करण्यात पुरुष वर्गच आघाडीवर असल्यामुळे त्यानं हातचं न राखता स्त्राr-पुरुष संबंधांचं रसभरीत वर्णन आपल्या काव्यातून केलं आहे. त्यातही स्त्राrच्या अंगप्रत्यंगाचं, ओठांपासून मांडय़ांपर्यंत आणि स्तनांपासून नितंबांपर्यंत. मग तो कालिदास असो किंवा भर्तृहरी किंवा आणखी कुणी.

…अन् तरीही ‘राधिका सांत्वनमु’ हे काव्य वाचल्यावर 18व्या शतकातील पुरुष वर्गाच्या भिवया काहीशा उंचावल्याच. कारण ‘राधिका सांत्वनमु’ नावाचं हे शृंगारकाव्य कुणा पुरुषाने लिहिलेलं नव्हतं, तर ते एका स्त्राrने लिहिलं होतं. मुद्दुपलनी बोलून चालून एक स्त्राr. एका स्त्राrने शृंगारकाव्य लिहावं, त्यातही ते थेट उघडंवाघडं लिहावं आणि एवढंच नाही तर तिने कामक्रीडेत स्त्राrने कसा पुढाकार घ्यावा हे सांगावं… हे म्हणजे त्यांच्या दृष्टीने जरा अतिच होतं!

मुद्दुपलनीने पुरुषसत्ताक पद्धतीने लादलेला हा सामाजिक विधिनिषेध मुळीच मानला नाही. राधेला कृष्णाची प्रेमिका-पत्नी दाखवून तिने इला नावाचं एक पात्र त्याच्या आयुष्यात आणलं. राधा-कृष्णाचा कामलीलांनी युक्त संसार सुरू असताना इला लहानगी होती. तीही सतत त्यांच्या बरोबरच असायची. अंगणापासून शयनगृहापर्यंत. तिच्या वाढत्या वयातल्या भावना राधेने त्या काळात समजून घेतल्या आणि त्या भावनांना पोषक खतपाणीही घातलं, परंतु तेव्हा राधेला कुठे ठाऊक होतं की, ही इलाच येईल आपल्या आणि कृष्णाच्या मध्ये! पण ती आलीच त्या दोघांच्या मध्ये तेव्हा अतिशय सुकुमार असलेल्या आणि कामलीलांपासून अनभिज्ञ असलेल्या इलेला त्याबाबतीत तयार करण्याची जबाबदारीही राधेवरच पडली. राधेनेही ती कौशल्याने पार पाडली.

‘राधिका सांत्वनमु’मधील ही राधा म्हणजे मुद्दुपलनीच असल्याचं म्हटलं जातं. सुरुवातीला तंजावरच्या प्रतापसिंह राजाची प्रेमपात्र असलेली आणि त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी येताच दुखावली गेलेली. यातूनच तिने ‘राधिका सांत्वनमु’ हे चार भागांचं आणि 584 पदं असलेलं प्रतीकात्मक तेलुगू शृंगारकाव्य लिहिलं.

मुद्दुपलनी स्वतच्या क्षमतेचा आणि ज्ञानाचा आवाका नीट ठाऊक असलेली स्त्राr होती. तसंच लैंगिक भावना फक्त पुरुषालाच असतात असं नाही, तर स्त्राrलाही असतात. फक्त त्या दाबून ठेवाव्या लागतात हे ती चांगलंच जाणून होती. म्हणूनच तिने एक प्रकारे ‘राधिका सांत्वनमु’ या काव्याच्या आधारे स्त्राrच्या लैंगिक भावनांना उघड उघड आवाज दिला. स्त्राrलाही लैंगिक भावना असतात हे तिने दणक्यात सांगितलं. मात्र एका स्त्राrनं सांगितलेलं म्हणून तिच्या या शृंगारकाव्याची उपेक्षा करण्यात आली…

…पण काळ सूड उगवतो.

तब्बल शंभर-दीडशे वर्षांनी बंगळुरू नागरत्नम्मा (1878-1952) जन्माला आली. मुद्दुपलनीचीच विद्वत्ता, रूप आणि तेज घेऊन. योगायोग म्हणजे नागरत्नम्माही परंपरेने देवदासीच होती. नृत्य-गायनासाठी प्रसिद्ध असलेली नागरत्नम्मा, कर्नाटक संगीताला प्रतिष्ठा मिळवून देणाऱया संगीतकार त्यागराज यांच्याप्रती असलेल्या समर्पणासाठीही ओळखली जाते. महत्त्वाचं म्हणजे नागरत्नम्मा बहुभाषाकोविद होती. कन्नड, तेलुगू, संस्कृत या भाषांबरोबरच तिचं इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होतं. या भाषाप्रेमामुळेच तिने स्वतची प्रकाशन संस्था सुरू केली. शिवाय ती विविध विषयांवर भाषणंही देत असे. भाषणं देत फिरत असतानाच एकदा तंजावर मुक्कामी नागरत्नम्माची मुद्दुपलनी व तिच्या ‘राधिका सांत्वनमु’ या शृंगारकाव्याशी गाठ पडली.

…आणि नागरत्नम्माचं आयुष्यच बदलून गेलं. शंभरेक वर्षांपूर्वी एका स्त्राrने शृंगारिक काव्य लिहावं याचंच तिला कौतुक वाटलं. पहिला तेलुगू-इंग्रजी शब्दकोश तयार करणारा तेलुगू पंडित चार्ल्स फिलिप ब्राऊन याने 1855 मध्ये इंग्लंडला परत जाताना आपल्याकडील पुस्तकांचा खजिना मद्रासच्या ओरिएन्टल ग्रंथालयाला दिला होता. त्या खजिन्यात मुद्दुपलनीच्या ‘राधिका सांत्वनमु’चं हस्तलिखित होतं. या हस्तलिखितावरून पैदिपती व्यंकटनरसू यांनी आधी 1887 आणि नंतर 1907 मध्ये ‘राधिका सांत्वनमु’ प्रकाशित केलं. मात्र एक स्त्राr एवढं उघड उघड शृंगारिक वर्णन कशी काय करू शकते, याचं आश्चर्य वाटून आणि काहीसा संकोच वाटून त्यांनी ‘राधिका सांत्वनमु’ पुस्तकातील बराचसा शृंगारिक भाग गाळून टाकला. नागरत्नम्माच्या हाती लागलेली प्रत हीच पैदिपती व्यंकटनरसू यांनी संपादित केलेली होती. मात्र नागरत्नम्माला हे संपादित पुस्तक मुळीच आवडलं नाही. त्यातला आत्माच पैदिपती व्यंकटनरसू यांनी काढून घेतलाय, असं तिला वाटलं. त्यामुळे तिने मूळ हस्तलिखित पोथी मिळवली आणि ‘राधिका सांत्वनमु’ नव्याने पूर्णपणे आणि आपल्या प्रस्तावनेसह छापलं. नागरत्नम्माने संपादित केलेली ‘राधिका सांत्वनमु’ची ही आवृत्ती प्रसिद्ध तेलुगू पंडित आणि सरस्वती मुद्रालयाचे मालक वाविल्ला रामास्वामी शास्त्रgलू यांनी 1909 मध्ये छापली होती.

अर्थात काळ बदलला तरी सनातनी वृत्ती तशीच होती. त्यामुळेच 18व्या शतकातील काव्य विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात छापलं गेलं तेव्हाही त्याला नैतिकतेच्या तथाकथित ठेकेदारांच्या टीकेला सामोरं जावं लागलंच. परिणामी ब्रिटिशांनी तत्कालीन दंड संहितेच्या 292 कलमांतर्गत ‘राधिका सांत्वनमु’वर बंदी आणली.

‘राधिका सांत्वनमु’वरची ही बंदी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती. मात्र त्या पुस्तकावरची बंदी उठली तेव्हा नागरत्नम्मा थकलेली होती. योगायोग म्हणजे 19 मे 1952 मध्ये नागरत्नम्माचं निधन झालं. त्याच वर्षी वाविल्ला रामास्वामी शास्त्रgलू यांनीच ‘राधिका सांत्वनमु’च्या नागरत्नम्मा संपादित दुसऱया आवृत्तीचं प्रकाशन केलं. कारण मुद्दुपलनीची कला-साहित्य टिकवून ठेवण्यासाठी नागरत्नम्माने दिलेला लढा किंवा उपसलेले कष्ट म्हणजे एक मोठं धाडसच होतं हे त्यांना ठाऊक होतं.

[email protected]