धनुष्यबाण शिवसेनेचे पंचप्राण, ‘मातोश्री’च हायकमांड, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनुष्यबाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे, तर मातोश्री हे हायकमांड आहे. आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्याला नाही, तर रायगडाला सलाम करतो हेच आमचं हिंदुत्व आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी केले.

नाशिक येथे शनिवारी शिवसेना मेळाव्यात खासदार संजय राऊत बोलत होते. बंडखोर आणि भाजपाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. हजारोंच्या संख्येने असलेली उपस्थिती पाहून ते म्हणाले की, नांदगाव, मालेगावसह सर्व फुटीरांना बोलवा आणि दाखवा, शिवसेना ही जागच्या जागी आहे. चाळीस आमदार, काही खासदार म्हणजे शिवसेना हरली असे होत नाही. ते फुटून तिकडे गेले, त्यांनी शिवसेनेशिवाय विधानसभेत पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेलीच शिवसेना खरी असून ती आमची आहे. शिवसेना खरी-खोटीचा वाद नसून, तो वाद इमानदारी विरुद्ध बेइमानदारीतला आहे. भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीरच खुपसलाय असे सांगून ते म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा ‘मातोश्री’वर आले. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद शिवसेनेला देऊ, असा शब्द त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. निवडणुकीनंतर त्यांनी तो शब्द फिरवला तेव्हा आता फुटलेल्या चाळीस आमदारांचा आत्मा का जागा झाला नाही? तेव्हा त्यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

शिवसेनेशी बेइमानी महाराष्ट्र खपवून घेत नाही

स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हायकमांडला भेटायला दिल्लीत गेले. त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे. शिवसेनेचं, महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं हायकमांड ‘मातोश्री’ आहे. शिवसेनेशी बेइमानी महाराष्ट्र खपवून घेत नाही हा इतिहास आहे. शंभर आमदार आणि पंचवीस खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेत आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.