मालवणी विषारी दारुकांड प्रकरण; चौघे दोषी, दहाजण निर्दोष

नऊ वर्षांपूर्वी मालाड- मालवणीमध्ये घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणात सत्र न्यायालयाने सोमवारी चौघांना दोषी ठरवले, तर दहा आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. फडणवीस सरकारच्या काळात हे दारुकांड घडले होते. त्यात तब्बल 106 लोकांचा बळी गेला होता. न्यायालय 6 मे रोजी शिक्षेचा फैसला जाहीर करणार आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश स्वप्निल तवशीकर यांनी दारुकांडाच्या खटल्याचा निकाल जाहीर केला. ऑक्टोबर 2015 मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. मुख्य आरोपी राजू ऊर्फ लंगडा हनुमंत तापकरसह एकूण 14 आरोपींविरुद्ध नऊ वर्षे खटला चालला. सत्र न्यायालयाने राजू तापकर, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डिमेलो, मन्सूर खान या चौघांना भारतीय दंड संहिता आणि मुंबई प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हेगारी कट रचणे, सदोष मनुष्यवध व इतर आरोपांखाली दोषी ठरवले. इतर दहा आरोपींविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. पोलिसांनी काहीही पुरावे नसताना आरोपी बनवले होते, असा दावा आरोपी गीता सय्यदतर्फे अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी केला. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांनी बाजू मांडली.

फडणवीसांची घोषणा फोल

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोपींना फाशी व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती; परंतु 14 पैकी 10 आरोपी निर्दोष सुटल्यामुळे फडणवीसांची घोषणा फोल ठरली आहे.

गुजरातमधून आले होते केमिकल!

आरोपी मन्सूर खानने दारूत जे केमिकल मिसळले होते ते त्याला गुजरातमधून मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु ते केमिकल कोणी पाठवले हे सिद्ध झालेले नाही. खानने 7 ते 8 विव्रेत्यांना दारूचे वाटप केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. इतर आरोपींच्या दोषत्वासाठी पुराव्यांची साखळी निर्णायक नाही, असे न्यायालयाने नमूद केले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या खटल्यात 240हून अधिक साक्षीदार तपासले.