हिंदुस्थानने पदकांची शर्यत जिंकली, आशियाई ऍथलेटिक्समध्ये 27 पदकांची लयलूट

थायलंडमध्ये पार पडलेल्या 25व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी अखेरच्या दिवशी 9 रौप्य, 5 कास्य अशी एकूण 14 पदकांची लयलूट केली. स्पर्धेत 6 सुवर्णांसह एकूण 27 पदकांची कमाई करीत हिंदुस्थानने गुणतक्त्यात तिसरा क्रमांक पटकावला.

800 मीटर शर्यतीत रौप्य पदक
हिंदुस्थानला 800 मीटर शर्यतीत पुरुष व महिला या दोन्ही गटात रौप्य पदके मिळाली. पुरुष गटात किशन कुमारने 1 मिनिट 45.88 सेंकद वेळेसह हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करीत हे रूपेरी यश संपादन केले. कतारचा अबुबाकर हैदर (1 मिनिट 45.33 सेंकद) सुवर्ण, तर चीनचा ली डेजू कास्य पदकाचा मानकरी ठरला. महिला गटात श्रीलंकेच्या थारुशी डिसनायका हिने 2 मिनिटे 00.66 सेंकद वेळेसह सुवर्ण पदक जिंकले. हिंदुस्थानच्या चंदाला 2 मिनिटे 00.66 सेंकद वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. श्रीलंकेचीच एबरथना गायनथिका 2 मिनिटे 03.25 सेंकद वेळेसह कास्य पदकाची मानकरी ठरली.

चालण्याच्या शर्यतीत रौप्य अन् कास्य
20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत हिंदुस्थानला महिला गटात रौप्य, तर पुरुष गटात कास्य पदक मिळाले. प्रियंका गोस्वामीने 1 मिनिट 34.24 सेंकद वेळेसह रौप्य पदक जिंकले. चीनची यांग लिजुइंग (1 मिनिट 32.37 सेंकद) सुवर्ण पदकाची मानकरी ठरली, तर जपानची युकिको उमेनो (1 मिनिट 36.17 सेंकद) हिने कास्य पदक मिळवले. पुरुष गटात हिंदुस्थानच्या विकास सिंहने कास्य पदक मिळवले. जपानचा युत्रो मॉयमा सुवर्ण, तर चीनचा वांग काईहुआ रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

पाच हजार मीटर शर्यतीत तीन पदके
पाच हजार मीटर शर्यतीत हिंदुस्थानला एक रौप्य व दोन कास्य पदके मिळाली. महिला गटात पारूल चौधरीने 15 मिनिटे 52.35 सेंकद वेळेसह रौप्य पदकाची कमाई केली, तर अंकिताला (16 मिनिटे 03.33 सेंकद) कास्य पदक मिळाले. जपानची युमा यामाटो (15 मिनिटे 51.16 सेंकद) ही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. पुरुषांच्या गटात हिंदुस्थानच्या गुलवीर सिंहने 13 मिनिटे 43.92 सेंकद वेळेसह कास्य पदक जिंकले. या प्रकारात जपानचा ह्युगा इंडो (13 मिनिटे 34.94 सेंकद) याने सुवर्ण पदकावर नाव कोरले.

ज्योतीला 200 मीटरमध्ये रौप्य
100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदकाची कमाई करणाऱया ज्योतीने 200 मीटर शर्यतीतही रौप्य पदकाची कमाई केली. तिने 23.13 सेंकद अशी हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली. सिंगापूरची शांती पिरेरिया (22.70 सेंकद) सुवर्ण, तर चीनची ली युटिंग (23.25 सेंकद) कास्य पदकाची मानकरी ठरली.