निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर आंदोलनाचा भडका, दिल्लीत तरुणीने अडवली पोलिसांची बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून शुक्रवारी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे विरोधकांनी विराट आंदोलन छेडले. गांधी जयंतीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेससह विरोधी पक्षांचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. संपूर्ण दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी ‘आप’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज आणि माजी मुख्यमंत्री अतिशी यांच्यासह सुमारे हजार आंदोलकांना ताब्यात घेतले.

या सर्व गदारोळात एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बससमोर ही तरुणी ठामपणे उभी राहिली. तिने बसच्या बोनेटवर हात ठेवून आत असलेल्या आंदोलकांची सुटका होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देण्यास नकार दिला. पोलिसांकडून वारंवार बाजूला होण्याच्या सूचना देऊनही ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, दिल्लीतील राजकीय वर्तुळात याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे मुंबईत पार पडलेल्या विद्यार्थी आंदोलनाची आठवण ताजी झाली आहे. जुलै महिन्यात मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान मॉडेल रिया आहीर हिने अशाच प्रकारे भर पावसात  पोलिसांची व्हॅन अडवली होती. त्या एका फोटोने संपूर्ण आंदोलनाला नवी दिशा दिली होती आणि सीजेपीच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकारानंतर रिया आहीर प्रकाशझोतात आली असून नुकतीच ती ‘बिग बॉस’ या प्रसिद्ध रिॲलिटी शोमध्येही दिसली होती.

दिल्लीतील या ताज्या घटनेवर आता सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी या तरुणीच्या धैर्याचे कौतुक करत “आजची युवा पिढी (Gen Z) चुकीच्या गोष्टींविरोधात न घाबरता उभी राहते,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे, अनेकांनी या कृत्याला केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ आणि प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग म्हटले आहे. रिया आहीरचे कृत्य उत्स्फूर्त होते, तर हे कृत्य इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी ठरवून केलेले नाटक वाटत असल्याची टीकाही काही वापरकर्त्यांनी केली आहे.