
देशातली राजकीय हवा बदलायला सुरुवात झाली आहे. भूकंप होण्यापूर्वी जसे भूगर्भातून काही हालचाली जाणवतात, तसेच काहीसे सध्या देशाच्या राजकारणात आणि भाजपमध्ये सुरू झाले असल्याची टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आगामी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत देशाच्या राजकारणात फार मोठे भूकंपाचे धक्के बसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांना पत्रकारांनी, तुम्ही राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ पाहत आहात का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी भूगर्भातील हालचालींचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, भूकंप होण्यापूर्वी जसे भूगर्भातून काही हालचाली जाणवतात, लहान-लहान धक्के बसतात, खाटा आणि पंखे हलतात, तसेच काहीसे सध्या देशाच्या राजकारणात आणि भाजपमध्ये सुरू झाले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत देशाच्या राजकारणात फार मोठे फेरबदल पाहायला मिळतील, फार मोठे भूकंपाचे धक्के या राजकारणात बसतील. असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
देशातील क्षेत्रीय असो किंवा राष्ट्रीय माध्यमे, ज्यांना आपण ‘गोदी मीडिया’ किंवा सरकारची चमचेगिरी करणारे वृत्तपत्र मानतो, त्यांनीही शुक्रवारी सीजेपी आणि आपच्या आंदोलनाला प्रमुख जागा आणि मोठी प्रसिद्धी दिली आहे. मीडियामध्ये सरकारविरोधी असंतोष आणि रोष मोठ्या प्रमाणावर झळकत असल्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, देशातली राजकीय हवा वेगाने बदलत आहे. मी यापूर्वीच 17 सप्टेंबरनंतर देशात काय घडते ते पाहा, असे सांगितले होते. त्यानुसार 17 सप्टेंबरनंतर देशातील राजकीय हवेत बदल होण्यास सुरुवात झाली असून, नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी राहणार नाहीत, हे लवकरच स्पष्ट होईल असे संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पक्षांतर्गत आणि संघपरिवारात अत्यंत वाईट अवस्था
सध्याची परिस्थिती पाहता, संपूर्ण सरकारलाच बदलवावे लागेल किंवा मोदींना स्वतः जावे लागेल, अशी चर्चा आहे. मात्र, सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पक्षांतर्गत आणि संघपरिवारात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. भाजप आणि देशाला तर त्यांचे ओझे झालेच आहे, पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांचे ओझे नकोसे झाले आहे, असे सांगत राऊत म्हणाले की, देशातील जनता आता मोदी आणि शहांचा तिरस्कार करू लागली असून त्यांच्याबद्दल थेट द्वेष व्यक्त होत आहे. अशी व्यक्ती पक्षाचे किंवा देशाचे नेतृत्व करण्यासाठी अजिबात परवडणारी नाही, त्यामुळे मोदींना जावेच लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान पद आणि मोदींचे वारसदार करण्याची संघाची भूमिका
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाऊन देशाचे उपपंतप्रधान पद मिळावे आणि तेच नरेंद्र मोदींचे राजकीय वारसदार असावेत, अशी राष्ट्रीय स्तरावर संघ परिवाराची भूमिका असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात भाजप आणि संघामध्ये सध्या खरोखरच चर्चा सुरू आहे. जर अशा घडामोडी घडत असतील, तर फडणवीसांना आमचे आवाहन आहे की त्यांनी आधी महाराष्ट्रात लोकशाहीची मजबूत पायाभरणी करावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शुक्रवारी ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आणि विरोध दर्शवला, तो प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींना आज ज्याला सामोरे जावे लागत आहे, त्याचे कारण त्यांची लोकशाही विरोधी भूमिका आहे. हा खरा धडा पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याआधी वा जाण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी घ्यायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींविरोधात जे बंड पुकारले गेले आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. या देशामध्ये कुणी कितीही मोठे राज्यकर्ते असो किंवा कितीही उद्योगपतींचा पाठिंबा असो, जर जनता रस्त्यावर उतरली आणि चीड निर्माण झाली, तर लिबियाच्या गडाफीप्रमाणे जनता पळवून पळवून मारेल, हे वास्तव आहे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणूनच आता सरकारमधील अनेक लोक स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
मेट्रो सिनेमा ते महापालिका असा ठरला नवीन मार्ग, महाविकास आघाडीसह डाव्या पक्षांचाही पूर्ण पाठिंबा
शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांचा ऐतिहासिक संयुक्त मोर्चाला आता अवघे 24 तास शिल्लक राहिले असून, संपूर्ण मुंबईत या मोर्च्याची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, या मोर्च्याच्या मार्गात किंचित बदल करण्यात आला असून, शुक्रवारी याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे. आधी ठरलेल्या नियोजनानुसार सर्वानी भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीजवळ जमून महापालिकेच्या दिशेने फोर्टच्या मार्गाने निघायचे ठरले होते. मात्र, हा मार्ग काहीसा अडचणीचा वाटल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता नवीन ठरलेल्या मार्गावर हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघून थेट महानगरपालिकेसमोर उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यासपीठापर्यंत जाईल आणि उद्या हा महामोर्चा अत्यंत दणक्यात निघेल, शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह आणि त्यांच्यातील प्रचंड चीड पाहायला मिळाली. दोन ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने पुढे जात असलेल्या या मोर्च्यात सर्वच प्रमुख पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षातर्फे ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे यांनी जयंत पाटील यांचे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करत शेतकरी कामगार पक्षाने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा झाली असून, उद्धव ठाकरेंची शरद पवार यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे. काँग्रेसचीही चर्चा झालेली आहे. सर्व डावे पक्ष, प्रमुख पक्ष शिवसेना मनसे असा हा एक महाविकास आघाडी म्हणून त्या ज्ञानेश कुमार विरोधात, निवडणूक आयोगाविरोधात प्रचंड मोर्चा निघेल. हा मोर्चा ज्ञानेश कुमारने आपल्या पदाचा राजीनामा देऊन दूर व्हावे, या मुख्य मागणीसाठी निघणाऱ्या या महामोर्च्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, उद्या या मोर्च्याचे खरे स्वरूप कळेल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.





























































