
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचा कुस्तिगिर अमन शेरावतने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. अमनने उत्तर कोरियाच्या वर्ल्ड नंबर १ च्या पैलवानाला कुस्ती सामन्यात आस्मान दाखवत सुवर्णपदक जिंकले.
अमन शेरावत आणि उत्तर कोरियाचा चोंग सोंग हान यांच्या अखेरच्या मिनिटापर्यंत सामना रंगला. या सामन्यात अमनने चोंग सोंग हानचा ११-७ अशा गुणांनी पराभव केला. आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. आशिया क्रीडा स्पर्धेतले हिंदुस्थानचे हे २० वे तर कुस्तीततले दुसरे सुवर्णपदक आहे. अमन शेरावतचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे.
अखेरच्या मिनिटाला गेम फिरला
अमन आणि चोंग सोंग हानमधील कुस्तीचा सामना ६ मिनिटं चालला. यात तीन-तीन मिनिटांचे दोन राउंड झाले. अमनने २-० अशी सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. पहिले तीन मिनिटं संपेपर्यंत तो आघाडीवर होता. पुढच्या तीन मिनिटांत चोंग सोंग हानने चांगला खेळ केला. चौथ्या आणि पाचव्या मिनिटाला चोंग सोंग हानने सामन्यावर वर्चस्व मिळवले. मात्र, सामन्याचा अखेरचा मिनिट उरला असताना चोंग सोंग हानने ७-६ अशी आघाडी घेतली होती. मात्र, आक्रमक खेळत असलेल्या चोंग सोंग हानला आपलीच आक्रमकता नडली. याचा फायदा अमनने घेतला. अमनने चोंग सोंग हानचा डाव त्याच्यावरच उलटवत २ गुण मिळवले. अमनने आघाडी घेतल्याचे पाहून उत्तर कोरियाच्या गटाने रेफरीच्या निर्णयाला आव्हान दिले. पण त्यांचे आव्हान त्यांच्यावर उलटले आणि अमन शेरावतने ११-७ अशा गुणांनी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले.

























































