पाकिस्तान न्यायपालिकाही दबावात; फायरवॉल उभी करण्याची मागणी 

हिंदुस्थान पाठोपाठ पाकिस्तान न्यायपालिका दबावाखाली असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मन्सूर अली शाह यांनी न्यायपालिकेतील हस्तक्षेप थांबवण्यासाठी फायरवॉल बांधण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयातील आठ पैकी सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायिक परिषदेला पत्र लिहिले आहे. आयएसआयचा न्यायपालिकेत हस्तक्षेप वाढत आहे. न्यायाधीशांच्या नातलगांना त्रास दिला जात आहे. न्यायाधीशांच्या घरात सीसीटीव्हीची नजर असते, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

या पत्राचा आधार घेत न्या. शाह यांनी न्यायपालिकेवरील दबावावर उघडपणे भाष्य केले. पाचव्या आस्मा जहांगीर परिषदेत ते बोलत होते. न्यायपालिकेतील हस्तक्षेपाविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. त्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. हा हस्तक्षेप थांबवण्यासाठी फायरवॉलची गरज आहे, असे न्या. शाह यांनी सांगितले.