
केम येथील मल्हारी कांबळे यांच्या खुनाचा गुन्हा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघड करून दोघा आरोपींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी दुसरे-तिसरे कोणी नसून, मृताची सख्खी बहीण शीतल राजेश केंगार व मेव्हणा राजेश बापू केंगार हे आहेत. दारूड्या भावाचा बहिणीनेच खून केल्याचे तपासात उघड झाले.
१२ एप्रिल रोजी केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला असलेल्या गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (वय ३८) यांचे प्रेत आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद केली होती. मृताची बहीण शीतल व मेव्हणा राजेश यांनी मृतास दारूचे व्यसन असल्याचे सांगून कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.
पोस्टमार्टम रिपोर्टने उघड झाले बिंग
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर अंमलदार पोपट टिळेकर व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना शीतल व राजेश केंगार यांच्या हालचालींवर संशय आला. कसून चौकशी केली असता, ‘भाऊ मल्हारी रोज दारू पिऊन माझ्यासोबत भांडण करायचा, तुम्ही येथून निघून जा,’ असे म्हणायचा. त्यामुळे मी वैतागले होते, असे बहीण शीतल हिने सांगितले. ११ एप्रिल रोजी भाऊ मल्हारी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला व भांडण करू लागला. राग अनावर झाल्याने शीतलने ओढणीने भावाचा गळा आवळून जीव घेतला. त्यावेळी पती राजेश केंगार तेथे आला. त्याला सर्व प्रकार सांगितल्यानंतर दोघांनी मिळून खांद्यावर प्रेत घेऊन देवकर यांच्या विहिरीच्या कडेला टाकून दिले.
गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शीतल राजेश केंगार (वय ३०), राजेश बापू केंगार (वय ३२, दोघे रा. केम) यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहायक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोसई जाधव, अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, मनीष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल यांनी ही कामगिरी केली.



























































