सोनई परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये दहशत

सोनई परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मुळा कारखाना शनिशिंगणापूर हनुमानवाडी या परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून फिरून फिरून याच भागात पुन्हा येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिनाभरात या परिसरात बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याने शेळ्या व कुत्र्यांना ठार केले आहे.

शेतकरी व नागरिकांना या बिबट्याचा प्रचंड त्रास होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कच्चा रस्त्याने जाणारे शाळकरी मुले तसेच दूध घालणारे शेतकरी या बिबट्याच्या त्रासामुळे हैराण झाल्याचे चित्र आहे. दोन ते अडीच वर्षाची बिबट्याची मादी फिरत असून अनेक नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. मुळा कारखान्यालगत तिरमल वस्ती वाड्यावर वस्त्यावर बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे.

वांबोरी रोड लगत शाळेच्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवला होता. दोन-तीन दिवसापासून शनिशिंगणापूर , हनुमानवाडी या भागातही बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवला आहे. सोनईपरिसरात व आसपासच्या वाड्या वस्त्यावर दोन ते तीन बिबट्यांचा मुक्त वावर होत असल्याने वाड्या वस्त्यावरील जनतेमध्ये प्रचंड घबराट आहे. बिबट्याचा वन खात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शेतात रात्री पाणी भरण्यासाठी व काम करणाऱ्या मजुरांना शेतकऱ्यांना जावे लागत असल्याने बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याचा होत असलेला सततच्या मुक्त वावरामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.