हातकणंगलेतून संधी दिलेल्या दोन्ही खासदारांनी काय विशेष काम केले? जयंत पाटील यांचा सवाल

‘आमचा उमेदवार गद्दार नाही. तो पक्ष, नेता आणि जनतेशी प्रामाणिक आहे. ते स्वतः शेती करतात. त्यांना शेती आणि शेतकऱयांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. आपण समोरच्या दोन्ही उमेदवारांना हातकणंगलेतून खासदार म्हणून संधी दिली. त्यांनी किती संपर्क ठेवला? काय विशेष काम केले?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष-आमदार जयंत पाटील यांनी केला.

हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सत्यजीत पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ कसबे डिग्रज व समडोळी येथील जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी युवा नेते प्रतीक पाटील, विजयराव पाटील, संजय पाटील, शिवसेनेचे शकील सय्यद, उदयसिंह सरनोबत, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे, सरपंच रियाज तांबोळी, उपसरपंच सुनीता निकम, भरत देशमुख, प्रा. बाळासाहेब मासुले, संजय चव्हाण, वैभव पाटील, सरपंच सुनीता हजारे, सुरगोंड पाटील, दिनेश ऐतवडे उपस्थित होते.

‘गेल्या 15 वर्षांत हातकणंगले मतदारसंघात दाखविण्यासारखे असे एकही काम झालेले नाही. विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकलेच नाहीत. आता कुठे पेठ-सांगली रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याचा ठेकाही 48 टक्के कमी किमतीस घेतला आहे. त्यामुळे हा रस्ता कसा होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे, असा आरोप करत जयंत पाटील म्हणाले, अपक्ष खासदार कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. तो कोणत्या एका विचाराशी पक्का राहू शकत नाही. सत्यजीत पाटील हे आपल्याशी सातत्याने संपर्कात राहून विकासकामांना निश्चित गती देतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्यजीत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीने मतदारसंघात आणि राज्यात समर्थ पर्याय उभा केला असून, महाविकास आघाडीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारला स्पष्ट बहुमत असतानाही देशातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात पूर्ण अपयश आले आहे. त्यांनी विकासकामावर बोलावे, निवडणुका निःपक्षपाती घ्याव्यात. जनता त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही.’

प्रतीक पाटील म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱयांचा कार्यक्रम झालेला दिसतो. म्हणून देशाचे पंतप्रधान धर्माची भाषा बोलत आहेत. सरकार शिक्षणावरही कर लावून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव खेळत आहे.’

कसबे डिग्रजचे माजी सरपंच अशोक चव्हाण, रामभाऊ मासाळ, रामभाऊ लाड, संजय शिंदे, गीतांजली मोहिते, कृष्णाजी मसाले, प्रमोद ढोले, ताजुद्दीन मुजावर, महाबळ मुंडे, किरण पाटील, अभय पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मतदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.