महायुतीतील पेच काही संपेना; पाच जागांचा तिढा वाढला, मागे हटण्यास कोणाचीही तयारी नाही

देशात इंडिया आघाडीविरोधात भाजप आणि राज्यात भाजप्रणीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत आहे. निवडणुकीचे दोन टप्पे झाले तरी महायुतीतील जागावाटपाचा पेच अद्याप संपलेला नाही. महाविकास आघाडीने जागावाटपासह प्रचारातही आघाडी घेतली असताना महायुतीत अजूनही तिढा कायम आहे. महायुतीत एकूण पाच जागांवर वाद आहे. या पाच जागांच्या दाव्यावरून मागे हटण्यास कोणीही तयार नसल्याने वाद वाढतच आहे.

ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, कल्याण आणि नाशिक या पाच लोकसभा जागांबाबतचा महायुतीतील तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. या पाच जागांवर भाजपसह अजित पवार गट आणि शिंदे गटाने दावा सांगितला आहे. तसेच मागे हटण्यासाठी कोणीही तयार नसल्याने महायुतीतील तिढा वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार आणि या जागा कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ठाण्याची जागा शिंदे गटालासह भाजपलाही हवी आहे. त्यामुळे या जागेबाबत अद्या चर्चा सुरु असून मागे हटण्यास कोणीही तयार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा त्यांच्या गटालाच मिळावी, असा आग्रह धरला आहे. त्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. कल्याणमध्ये शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. मात्र, ठाण्याच्या जागेचा निर्णय होत नसल्याने कल्याणच्या जागेचे घोडेही अडले आहे. त्यामुळे यातील ठाण्याचा जागेचा प्रश्न सुटल्याशिवाय कल्याणच्या जागेचा तिढाही कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्ये सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी नक्की असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भाजप आणि अजित पवार गटानेही या जागेवरील दावा सोडलेला नाही. प्रत्येकजण ही आपलीच जागा असल्याचे सांगत या जागेसाठी आग्रही आहे. पालघरमध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटाचे आहेत. मात्र, पण ही जागा शिंदे गटाला मिळणार की भाजप स्वतःकडे घेणार हे अद्याप ठरलेले नाही.

शिंदे गटाने अजूनही दक्षिण मुंबईच्या जागेची दावा सोडलेला नाही. मात्र, भाजपला ही जागा हवी आहे. त्यामुळे या जागेवरूनही महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्गची जागा भाजपकडे गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाला मिळाली आहे. मात्र, महायुतीत अजूनही पाच जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.