शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अनेक संघटनांनी लंके यांना दिला पाठिंबा

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज नगर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ख्रिश्चन,मुस्लिम यासह विविध समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक संघटनांनी निलेश लंके यांना शंभर टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले.

स्वाभिमान जन संवाद यात्रा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी त्यांची नंदनवन लोन येथे बैठक होती. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, प्रताप ढाकणे, शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख अभिषेक कळमकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहराध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर , नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय जाधव, आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, विविध काम करणाऱ्या सामाजिक संघटनेने या ठिकाणी बऱ्यापैकी पाठिंबा दर्शवला. काही संघटनाने आपले प्रश्न शरद पवार यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. साहेबांनी सांगितलं की या सर्व गोष्टीवर कसा तोडगा काढता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहू. एमआयडीसीचे संघटना असो किंवा अन्य काही संघटना असो या सगळ्या संघटनांचे प्रश्न सोडवण्याच्या आम्ही प्रयत्न करू असा मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व संघटनांना मी मनापासून धन्यवाद देतो असे ते म्हणाले.