अनिल परब यांना कोर्टाकडून दिलासा; मारहाण प्रकरणात निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. मुंबई महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपा प्रकरणी दाखल गुह्यात सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब यांच्यासह दहा शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली.

जून 2023 रोजी वांद्रे येथील शिवसेनेचे कार्यालय अनधिपृत असल्याचे सांगत पालिकेने ते पाडले. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. आंदोलनानंतर शिवसैनिकांनी विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शाखेत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही कार्यालय पाडण्याचा निर्णय का घेतला, असा जाब अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी विचारला. त्या वेळी सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा आणि त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतले. या खटल्यावर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करत अनिल परब, सदानंद परब यांच्यासह दहा शिवसैनिकांची सुटका केली.