
खेड शहर व भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीतील बदामीचा पऱ्या येथील खोल डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या सख्ख्या चार भावांपैकी तीन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मुंबईहून खेड येथील कुंभारवाडा परिसरात राहणारे अनिल दगडू कांबळे यांच्याकडे आलेले त्यांचे हे चार पुतणे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. खेड शहर व भोस्ते गावादरम्यान असलेल्या बदामीचा पऱ्या येथील खोल डोहात ते पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र डोहातील खोल पाणी व प्रवाहामुळे तिघे जण पाण्यात बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पंचनामा करून तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तीन मुलांना गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. जगबुडी नदीच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस, प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य
या दुर्घटनेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. या दुर्घटनेत गोपाळ रामा कांबळे (40) या मोठय़ा भावाचा सुदैवाने जीव वाचला, तर त्याच्या मागील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आकाश रामा कांबळे (23), नरेश रामा कांबळे (22) आणि कैलास रामा कांबळे (17) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे सांगली येथील असून सध्या मुंबईतील चेंबूर मेट्रो स्टेशन परिसरात वास्तव्यास होते.






























































