बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी आता मुंबईचे थ्रीडी मॅपिंग होणार; पालिका तयार करतेय अद्ययावत अ‍ॅप

मुंबईतील बेकायदा बांधकामांना रोखण्यासाठी आता थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सर्व बांधकामांचा नकाशाच एका क्लिकवर उपलब्ध होणार असून बेकायदा बांधकाम झाल्यास कारवाई करणेही शक्य होणार आहे. शिवाय कोणत्या परिसरात किती बांधकामे आहेत याची माहितीही पालिकेला उपलब्ध होणार असून याचा उपयोग पुरावा म्हणूनही करता येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचीदेखील जोड असेल.

मुंबई महानगराचा सुनियोजनबद्ध विकास आणि देखभाल सहज, सोपी, सुलभ व्हावी या अनुषंगाने मुंबई महानगराचे हुबेहूब डिजिटल मॉडेल अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार महानगरपालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून मुंबईचे थ्रीडी मॅपिंग करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. नागरी दृष्टिकोनातून मुंबई महानगरात प्रशासन आणि नियोजन अधिक उत्तमरीत्या करण्यासाठी या थ्रीडी मॅपिंग (डिजिटल ट्विन) ची मोलाची मदत होणार आहे. मुंबई महानगरासाठी अद्ययावत आणि सर्वसमावेशक असे त्रिमितीय अर्थात थ्रीडी मॅपिंग (डिजिटल ट्विन) विकसित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर
जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यामध्ये मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व 25 प्रशासकीय विभागांचे मिळून 500 चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट असेल. या प्रकल्पासाठीचे तांत्रिक सहाय्य जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि वेरिटास (इंडिया) लिमिटेड यांच्याकडून संयुक्तपणे पुरविण्यात येत आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचीही मदत घेणार
– या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई महानगराचे अतिशय अचूक असे त्रिमितीय अर्थात थ्रीडी स्वरूपातील हुबेहूब डिजिटल प्रतिरूप विकसित करण्यात येईल. त्यासाठी अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याच्या जोडीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचीदेखील मदत घेण्यात येणार आहे.

– आगामी तीन वर्षांसाठी हे थ्रीडी मॅपिंग (डिजिटल ट्विन) आणि त्याच्याशी संबंधित माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारीही या पंपन्यांकडे असणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधा विकास, आपत्ती व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन व प्रतिबंध यासारख्या बाबी सोप्या होतील, अशी माहिती संचालक (माहिती-तंत्रज्ञान) शरद उघडे यांनी दिली.