
कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी ‘नमो शेतकरी’ योजना बंद करण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या 56 लाख लाभार्थ्यांना वर्षभरासाठी ‘नमो शेतकरी’ योजनेतून बाद करण्यात आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या ‘पीएम किसान’च्या धर्तीवर राज्यात जून 2023 पासून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना सुरू केली होती. यामध्ये पीएम किसान योजनेस पात्र असलेल्या राज्यातील शेतकऱयांना वार्षिक 6 हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांना ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक कारण पुढे करून ही योजना गुंडाळली जाण्याची दाट शक्यता आहे.
दोन हप्ते रखडले
‘नमो शेतकरी’ योजने अंतर्गत आजवर 93.08 लाख शेतकऱ्यांना आठ हप्त्यांमध्ये 14,816 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै, या दोन हप्त्यांचे वितरण रखडले आहे. कृषी आयुक्तालयाने नुकताच यासंदर्भातील प्रस्ताव सरकारला पाठविला आहे.
तोंडचा घास हिरावण्यासारखे – वडेट्टीवार
एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांचा हक्काचा निधी काढून घेण्याचा हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्यासारखे आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचत नाहीत, पण जाहिरातींवर मात्र कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असल्याची टीका कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.



























































