“ईडी आणि सीबीआय ही दोन शस्त्र काढली तर भाजपसारखे नामर्द कोणी नाही”, संजय राऊतांचा घणाघात

“अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यी चौकशी अजूनही सुरु आहे. स्वतः एकनाथ शिंदेंच्या मागे चौकशी सुरु आहे. प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, राहुल शेवाळे, भावना गवळी यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे. तपास यंत्रणांच्या धाकानेच ही सगळी माणसं भाजपने त्यांच्या बाजूने वळवली आहेत. बाकी तुमच्याकडे आहे काय? ईडी आणि सीबीआय ही दोन शस्त्र काढली तर भाजपसारखे नामर्द कोणी नाही.” असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शनिवारी नाशिक येथे ते बोलत होते.

“भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दादा भुसे, राहुल कुल आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. मी याविषयी तक्रार केली असून माझी चिकाटी कायम आहे. त्यामुळे त्यांना चौकशी करावीच लागेल. अन्यथा 2024 ला केंद्रात आमचं सरकार आल्यावर यांना जाब द्यावा लागेल.” असे राऊत यावेळी म्हणाले.

मिंध्यांना अजित पवारांची धुणी भांडी करावीच लागतील

“अजित पवारांना अर्थ खातं देऊ नये म्हणून मिंध्यांनी जंग जंग पछाडलं, आपट आपट आपटली आणि आपटून चपटीही झाली. मात्र अर्थ खातं अजित पवरांकडे गेलं. अजित पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांना अर्थ खात्याचा अनुभव दांडगा आहे. गेल्या वर्षभरात अर्थखात्याची जी उधळपट्टी सुरु आहे त्याला अजित पवार नक्कीच चाप लावतील. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत नको असं मिंध्यांचं म्हणणं होतं. अजित पवार आणि सोबतचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यावर मिंधे टाळ्या वाजवत आहेत, कारण त्यांची ती मजबुरी आहे. मिंध्यांना अजित पवारांची धुणी भांडी करावीच लागतील.” अशी टीका राऊतांनी केली.

भुजबळांच्या दरबारात विठ्ठलांची रांग

“2019 ला राष्ट्रवादीची भाजपसोबत चर्चा सुरु होती अनेकदा शरद पवारच याबद्दल मला सांगायचे. आत्ताही अजितपवारांचा गट कोणाशी काय चर्चा करतोय याचा गौप्यस्फोट सामनामधून मीच केला आहे. त्यामुळे भुजबळांनी जनतेला नवीन माहिती द्यावी तेच तेच फटाके फोडू नका. नाशिक मध्ये आम्ही छगन भुजबळांचा पराभव पावणे दोन लाख मतांनी आणि त्यांच्या पुतण्याचा तीन लाखांच्या मतांनी केला आहे. म्हणजे बेईमानी केल्यावर पराभवाची धूळ चाखण्याची भुजबळांना सवय आहे. भुजबळांनी आतापर्यंत दोन विठ्ठलांना सोडलंय. असे यांचे किती विठ्ठल आहेत आणि ते कसे बदलतात? विठ्ठलाच्या दरबारात भक्तांची रांग लागलेली असते मात्र भुजबळांच्या दरबारात विठ्ठलांची रांग लागलेली आहे.” असा टोला राऊतांनी लगावला.

भाजपने दिलेल्या ‘त्या’ पर्यायाने मिंधे गटाची हवाच काढली

“मिंध्यांचं दिल्लीला काहीच ऐकून घेतलं नाही. रहायचं असेल तर रहा, नाहीतर जा! असं त्यांना सांगितलं. अजित पवारांना अर्थ खातं द्यायचं नसल्यास ते खातं तुम्हाला घ्या आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांना द्या! असा प्रस्ताव दिल्लीला मिंध्यांसमोर ठेवला होता. या प्रस्तावामुळे मिंध्यांनी माघार घेतली.” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

शासनाच्या योजना अजूनही कागदावरच

“सरकारला जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाहिजे मात्र शासनाच्या कार्यक्रमांना व सभेसाठी माणसांना जबरदस्तीने आणावं लागत आहे. आज नाशिकच्या कार्यक्रमाला अजित पवार ट्रेनने आले आहेत कारण रस्त्याला खड्डे आहेत. आम्ही स्वतः काल खड्ड्यांमध्ये सहा तास अडकलो होतो. या खड्ड्यांमधून देखील जनतेने यायचं मंत्र्यांनी यायचं नाही. मात्र जनतेच्या दारात आणि मनात कोण आहे हे लवकरच कळेल. जनतेला खेचून आणावं लागत आहे याचा अर्थ योजना अजूनही कागदावरच असून त्या जनतेपर्यंत पोहोचल्याच नाहीत. योजनेची टक्केवारी कुठे गेली हे सगळ्यांना माहित आहे. शासन स्वतःच स्वतःच्या स्वागतासाठी होर्डिंग लावून शहराचं विद्रुपीकरण करत आहे.” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

वापर आणि फेक हे भाजपचं धोरण

“शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिंदे गटात अनेक लोकं अशी आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष काम केलं आहे. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नुकसानच होणार आहे. तरीही अजित पवार व त्यांच्यासह काम करणाऱ्या लोकांचा अनुभव दांडगा आहे. शिवसेना फोडण्यापुरतंच शिंदे गटाचं महत्व होतं. त्यामुळे आता त्यांचं महत्व संपलेलं आहे. शिंदे गट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही. ते आलेत तसेच जातील आणि अजित पवारांचा गट देखील सत्तेत फार काळ राहील याबाबाबत माझ्या मनात शंका आहे. वापर आणि फेक हे भाजपचं धोरण आहे. या देशातील अनेक पक्ष भाजपने तोडले वापरले आणि फेकून दिले. यामुळे या दोन्ही गटांची अवस्था तशीच होणार आहे.” असे राऊत म्हणाले.

“जाणारे जात असतात आणि नवनवीन कारणं शोधत असतात. जे गेले ते गेले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. पक्षाने त्यांना कमी दिलं होत का? अनेकदा आमदारक्या आणि मंत्रिपद देऊन त्यांनी पक्ष किती वाढवला? त्यांनी पक्षाचा किती विस्तार केला याचं प्रगतीपुस्तक त्यांच्याकडे आहे का? स्वतःच पाहणारे हे लोक स्वतःसाठीच निघून गेले. नीलम गोऱ्हे यांना पक्षाने खूप काही दिलं आहे. पक्षावर संकट असताना त्यांनी थांबायला हवं होतं. एकीकडे सामान्य शिवसैनिक संघर्ष करतोय. अशावेळी ज्यांना पक्षाने भरपूर काही दिलं आहे. निदान त्यांनी ते ऋण मान्य करून थांबायचं असतं. मात्र राजकारणात या गोष्टी सहन करूनच पुढे जायचं असतं. शिवसेना हे घाव पचवून एक पाऊल पुढे टाकत आहे.” असे राऊत म्हणाले.

“भावनिक दृष्ट्या जवळचा कोण आणि राजकीय दृष्ट्या जवळचा कोण हे काल त्यांनी सांगितलं. म्हणजे भाजपने राजकारणासाठी ही कूटनीती केली आहे. हेच आम्ही अडीच वर्षपूर्वी बोलत होतो मात्र त्याला भाजपची मान्यता नव्हती.”

“अब्दुल सत्तारांवर अलीकडे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यासह शिंदे गटाच्या ४ जणांचं मंत्रिपद जाणार आहे.”

“मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का करू शकले नाहीत? याच उत्तर त्यांच्या सहकाऱ्यांनी द्यावं. मंत्रिमंडळ विस्तार होणं कठीण दिसतंय आणि आता तर कोटाचे माप देखील वाढले असतील. त्यामुळे त्यांना नवीन कोट घ्यावे लागतील.” असा टोला राऊतांनी लगावला.

“सक्षम पर्याय कोणीच नसतो. पक्ष आणि ठाकरे ब्रँड हा महत्वाचा आहे. या सर्वांना पक्षाने निवडून आणलेलं आहे. शिंदे गटातील 17 ते 18 लोकं आमच्या संपर्कात आहेत, मात्र त्यांचं काय करायचं हा निर्णय आमच्याकडे अजून झाला नाही.” असे राऊत म्हणाले.