
>> उदय जोशी
महात्मा गांधींचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवत उपेक्षित लोकांचा आवाज बनून ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्यांसाठी वेचले, ज्यांनी चळवळीच्या माध्यमातून संघर्ष कसा करायचा हा आदर्श घालून दिला ते बाबूजी म्हणजेच डॉ. द्वारकादास लोहिया हे होत. माझ्या मृत्यूनंतर दहनासाठी झाडे तोडावी लागतील. म्हणून माझा दफनविधी करा आणि त्या जागेवर बोधीवृक्षाची लागवड करा जेणेकरून ऑक्सिजन तयार होईल असे आपल्या मृत्युपत्रामध्ये नोंदवून शेवटचा श्वास घेणारे बाबूजी सर्वांसाठी आदर्शमय व्यक्तिमत्त्व. तब्बल 40 वर्षे अंबाजोगाईच्या मातीमध्ये अहोरात्र कष्ट करत, उपेक्षित, गरीब, कष्टकरी शेतकर्यांसाठी संघर्ष करणारे डॉ. द्वारकादास लोहिया आयुष्यभर दुसर्यांसाठी जगले. 7 सप्टेंबर 1938 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे मोठे बंधू जुलमी रझाकारविरोधी चळवळीमध्ये सहभागी होते. तेच संस्कार डॉ. लोहिया यांच्यावर लहानपणापासून झाले. अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेत शिकत असताना राष्ट्रसेवा दलात काम केले. तेथे समता, सामाजिक ज्ञान, विज्ञान, निष्ठा या मूल्यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. पुढे नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून मिश्र आयुर्वेदाची पदवी त्यांनी संपादन केली. धुळे येथील शकुंतला परांजपे यांची मुलगी शैला यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. विवाहानंतर अंबाजोगाईत त्यांनी दवाखाना सुरू केला. व्यवसाय करत प्रबोधनाचे काम त्यांनी चालू ठेवले.
1975 च्या आणीबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी थेट सहभाग नोंदवला. 19 महिने ते नाशिकच्या कारागृहात ‘मिसाबंदी’ होते. त्यांनी अंबाजोगाईत मानवलोक म्हणजेच मराठवाडा नवनिर्माण लोकायत या संस्थेची स्थापना केली. मानवलोक या संस्थेचे कार्यवाहक म्हणून काम हाती घेतल्यानंतर प्रकल्पधारकांच्या प्राथमिक जबाबदार्यांना त्यांनी महत्त्व दिले. डॉ. द्वारकादास लोहिया यांनी राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी आरोग्य मंडळ या माध्यमातून समाजवादी विचारांचा प्रसार केला. पंचक्रोशीत, डोंगरदर्यात राहणार्या गोरगरीबांना मदतीचा हात देताना अनेक लढे उभारले. मग निराधार लोकांसाठी किंवा वंचितांसाठी, शेतकर्यांसाठी किंवा सिंचनासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे सरकारला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. प्रयोगशील व्यक्तिमत्त्वातून जिरायत शेती सिंचन करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी केलेले काम अलौकिक होते. त्यांनी अनेक जबाबदार्या पार पाडल्या. त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, परिवर्तन संस्थेचा पद्मविभूषण, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, राज्य विद्युत मंडळ असोसिएशनचा कै. शंकरराव किर्लोस्कर प्रतिष्ठान, विनायकराव चारठणकर प्रतिष्ठान, पुण्याच्या मनःशक्ती बँक, मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशनचा पर्यावरण, वामनराव ठाकूर स्मृती आणि अंबाजोगाईचा नगरभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठवाडा विकास आंदोलनातही त्यांनी आंदोलने केली. त्यांनी विविध क्षेत्रांवर लिखाण केले आहे. मार्गदर्शिका प्रकाशित केल्या. पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका प्रकाशित केल्या. डॉ. लोहिया यांच्या निधनाने मराठवाडा आदर्श कार्यकर्त्यास मुकला आहे.































































