जनता पाणीटंचाईने त्रस्त; लोकप्रतिनिधी निवडणुकीत मस्त

राज्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. त्यातच पाथर्डी शहरासह तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले असताना सर्वच पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीत गुंतल्याने आपली व्यथा नेमकी कोणाला सांगायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सलग तीन वर्ष पावसाने पाठ फिरवल्याने सध्या तालुक्यातील अनेक गावातील पाण्याची पातळी खालावली असून जवळपास पावणेदोन लाख लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागावी लागत आहे. ग्रामीण भागात अशी परिस्थिती असताना शहरातही पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, योजनेत बिघाड झाल्याने शहराच्या काही भागात आठ तर काही भागात अकरा दिवस उलटूनही पाणी न आल्याने पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास पंचायत समिती व नगर पालिकेतीस अधिकाऱ्यांना वेळ नाही. समितीमध्ये हक्काचा सदस्य नाही अन् पालिकेत हक्काचा नगरसेवक नसल्याने जमेल तसे आंदोलन करून सध्या नागरिक आपली व्यथा मांडत आहे. राज्यात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष असताना दुसरीकडे सर्वच पक्षाचे नेते सध्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत गुंतल्याने आम्ही समस्या मांडायच्या कोणाकडे, असा सवाल नागरिक करत आहेत. दिवसेंदिवस तालुक्यातील अनेक गावातून टँकरचे प्रस्ताव प्रशासनकडे दाखल होत असून भगवानगड तांड्यावरून आलेला प्रस्ताव अद्याप मंजूर न झाल्याने तेथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. पिण्यासाठी पाणी नसताना जनावरांसाठी पाणी कोठून आणायचे या प्रश्नाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच पाणी विकत घेणेही परवडत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील 80 टक्के बोअरवेल पाण्याअभावी बंद आहेत.