
सामना प्रतिनिधी । जळगाव
शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्ते निर्मितीसाठी श्रेय वादाच्या लढाईत जळगावकरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या प्रश्नी होणार्या आंदोलनात चमकोगिरीसाठी पोहचणार्या भाजपा पुढार्यांनी चार वर्षात नेमके काय केले हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. गिरीष महाजन, एकनाथ खडसे या दिग्गजांच्या गटबाजीत हे काम अडकले नाही ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
जळगाव शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ अर्थात एशिएन हायवे ४६ च्या कालिका माता मंदिर ते बांभोरीच्या जवळ पर्यंत सुमारे साडेसात ते आठ किलो मीटर समांतर रस्ते व्हावेत ही गेली अनेक वर्षाची जळगावकरांची मागणी आहे. महापालिकेने आर्थिक स्थितीचे कारण देवुन समांतर रस्ते करण्याचे टाळले. त्यानंतर तत्कालीन महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या कार्यक्रमात समांतर रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले. एकनाथ खडसे यांनी यासाठी केंद्र व राज्य पातळीवर बैठका घेऊन मंत्री पदाच्या काळात प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. समांतर रस्त्याच्या विकास आराखडा देखील तयार करण्यात आल्याचे प्रशासनाकडुन सांगितले जाते. केवळ निधीच्या रकमेत वाढ होत आहे. मात्र विकास आराखडा तयार असतांना समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी का लागत नाही असा सवाल पुढे आला आहे.
भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, ए.टी. पाटील व रक्षा खडसे हे दोन खासदार, जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे, विधान परिषदेतील आमदार चंदुलाल पटेल यांच्यासह अर्धा डझन भाजपचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात असतांना हा प्रश्न मार्गी लागला नाही. मागील काही महिन्यांपुर्वी कुठलीच नोंद नसलेल्या आणि अराजकीय असलेल्या जळगाव समांतर रस्ते कृती समितीने शाळकरी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. एप्रिल पर्यंत प्रश्न मार्गी लागेल असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन सांगितले. मात्र राजकीय पुढार्यांप्रमाणे जिल्हाधिकार्यांचे आश्वासन देखील मोठी थाप ठरली आहे. हा प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने पाच दिवसापासुन जळगावात साखळी उपोषण सुरू आहे.
भाजपचे खासदार, आमदार, महापौर व अन्य मंडळींनी साखळी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन फोटो काढत आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र चार वर्षापासुन केंद्र व राज्यात सत्ता असतांना या पुढार्यांनी काय केले. हे जनतेसमोर येण्याची गरज निर्माण झाली आहे. मनपा निवडणुकीच्या वेळी बॅनरबाजी करणारे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे समांतर रस्त्यांच्या विषयात दुर्लक्ष का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. खडसेंनी सुरू केलेले काम पुर्ण झाले तर त्यांना श्रेय जायला नको म्हणुन महाजन गप्प असल्याचे बोलले जात आहे. समांतर श्रेयवादाची लढाई सुरू असतांना नागरिकांनी नरभक्षक राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करून रोष व्यक्त केला आहे.

































































