
गेल्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई व आसपासच्या शहरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची घरे उघड्यावर पडली आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी निवडणूक आयोगाने बीएलओंच्या (BLO) माध्यमातून सुरू असलेली मतदार याद्यांची सखोल पुनरीक्षण मोहीम तूर्तास पुढे ढकलावी, अशी मागणी एका जागरूक नागरिकाने केली आहे.
मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम ३० जून ते २९ जुलै या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. या मोहिमेत बीएलओंच्या माध्यमातून गृहभेटी सुरू आहेत. मात्र, सध्या अतिवृष्टीमुळे झाडे, दरडी, भिंती आणि इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंबांची घरे उघड्यावर पडल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच अनेक नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक हे कोकणात गावी किंवा तीर्थयात्रेला गेले आहेत. काहींनी आपल्या जागा भाड्याने दिल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरदेखील परिणाम झाल्यामुळे मूळ मालकांना गृहभेटीच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहणे शक्य होत नाहीये. अशा परिस्थितीत गृहभेटी सुरू राहिल्यास अनेक नागरिक मतदार यादी पुनरीक्षणापासून वंचित राहू शकतात आणि त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती ॲड. नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही मोहीम तूर्तास पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परिस्थिती नियंत्रणात येऊ द्या
मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने बीएलओंचा गृहभेट कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश द्यावेत, तसेच आपत्कालीन परिस्थितीमुळे जे नागरिक सध्या उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा गृहभेट घेऊन त्यांची नोंद करण्यात यावी, अशी विनंतीदेखील ॲड. दहिबावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




























































