महामानवाचा फोटो आणि भारतरत्न पुरस्काराचा फोटो उलटा छापला, सरकारी ‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या व माहिती व जनसंपर्क संचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया ‘लोकराज्य’ मासिकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला आहे. या मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकात बाबासाहेबांचा फोटो आणि त्यांना मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा फोटो उलटा छापण्यात आला आहे. या निष्काळजीपणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेत कारवाईची मागणी केली. त्यावर याप्रकरणी 24 तासांच्या आत कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी ही गंभीर चूक सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकात पान क्रमांक 9 वर ‘महामानवाचा पदस्पर्श’ हा मिलिंद मानकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात बाबासाहेबांचा फोटो उलटा छापण्यात आला आहे. तसेच त्या फोटोच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न पुरस्काराचा फोटो आहे, तोसुद्धा उलटा आहे, असे आमदार राऊत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हा बाबासाहेबांचा अवमान असल्याचे सांगत असताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, तुमचा विषय लक्षात आला. पुनः पुन्हा तेच सांगू नका, असे म्हटल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी जागेवरून उठून याचा निषेध केला. याप्रकरणी तातडीने निवेदन करून कडक कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱया सरकारविरोधात घोषणाही त्यांनी दिल्या.

24 तासांत कारवाई केली जाईल

गदारोळातच विधानसभा अध्यक्षांनी विधेयके पुकारायला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः उत्तर दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. शासकीय मासिकात असा निष्काळजीपणा आणि एवढी मोठी चूक अत्यंत अक्षम्य आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, जे अधिकारी, कर्मचारी जबाबदार असतील, त्यांच्यावर 24 तासांत कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर सभागृह शांत झाले.